Lakhimpur Kheri Violence: “PM मोदी अशा गोष्टींवर कधीच काही बोलत नाहीत”; लखीमपूरवरुन सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 02:42 PM2021-10-06T14:42:17+5:302021-10-06T14:43:36+5:30
Lakhimpur Kheri Violence: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर खिरी हिंसाचारावर संताप व्यक्त केला.
पुणे: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात शिरलेली कार आणि त्यानंतर झालेला हिंसाचार यावरून देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. अगदी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह अनेकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर खिरी हिंसाचारावर संताप व्यक्त केला असून, पंतप्रधान मोदी अशा गोष्टींवर कधीच काही बोलत नाहीत, अशी टीका केली आहे. (ncp supriya sule criticised pm modi govt and bjp over lakhimpur kheri violence)
लखीमपूर हत्याकांडासारखी प्रकरणे आम्ही कधीच सहन करणार नाही. असा कुठलाही अन्याय कोणत्या महिलेवर आणि शेतकऱ्यांवर होणार असेल तर कोणाचीही सत्ता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सहन करणार नाही. तिथे लोक शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत होते. त्यांच्यावर झालेला हल्ला उत्तर प्रदेश सरकारनेच केला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शरद पवार बोलले, तीच पक्षाची भूमिका
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचारावर आपले म्हणणे मांडले आहे. शरद पवार यावर बोलले असून, हीच पक्षाची भूमिका आहे. आम्ही खंबीरपणे कुठल्याही अन्यायाच्या विरोधात उभे राहणार. प्रियांका गांधी तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलजी यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू. लखीमपुरमध्ये एवढे सगळे होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर काहीच न बोलल्याचे आश्चर्य वाटते. ते कधीच अशा प्रकरणांवर बोलत नाहीत. गेल्या महिनाभरात बलात्कार घटना झाल्या तेव्हाही गप्प होते, आताही ते काही बोलले नाही, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, आता महात्मा फुले यांचे मूळ गाव असणाऱ्या खानवडीत मुलींची मोठी शाळा बांधली जाणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात दिली. याठिकाणी महात्मा फुलेंचे स्मारकही होईल. तसेच सातारा, खानवडी आणि पुणे अशा तीनही ठिकाणी मुलींच्या शाळा बांधण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच राज्यातील ऐतिहासिक ठिकाणांचा विकास आणि डागडुजीवरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.