पुणे : केंद्र; तसेच राज्य सरकारच्या विरोधात सुरू केलेली राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा शनिवार व रविवारी (दि.२ व ३ फेब्रुवारी) पुण्यात येत आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व पक्षाचे अनेक नेते यात्रेत सहभागी असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या सहा सभांचे आयोजन दोन दिवसांत करण्यात आले आहे.पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजलक्ष्मी भोसले व सुरेश घुले यांनी ही माहिती दिली. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष चेतन तुपे, पालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे या वेळी उपस्थित होते. भोसले म्हणाल्या, ‘रायगडमधून सुरू झालेली ही परिवर्तन यात्रा राज्याच्या विविध भागांमधून, त्यातही ग्रामीण भागांमधून जनसंवाद करत आहे.’केंद्र व राज्य अशा दोन्ही ठिकाणच्या भाजपा सरकारच्या विरोधात जनभावना तीव्र होत असल्याचे त्यातून दिसत येत आहेत. गेल्या साडेचार वर्षांत कोरड्या आश्वासनांशिवाय व फसवणूक करणाऱ्या घोषणांशिवाय जनतेच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्याचा राग जनतेच्या मनात आहे. त्यांच्या भावना या यात्रेत राष्ट्रवादीकडून जाणून घेण्यात येत आहेत.घुले म्हणाले, शनिवारी (दि. २) यात्रा पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल. सकाळी ११ वाजता यवत पोलिस ठाण्यासमोर सभा होईल. दुपारी ३ वाजता काळभोर लॉन, सोलापूर रोड, लोणी काळभोर येथे सभा होईल. सायंकाळी ६ वाजता पी. डब्ल्यू. डी. ग्राऊंड सांगवी येथे सभा होणार आहे. रविवारी (दि. ३) मार्केट यार्ड मंचर, ता. आंबेगाव येथे सकाळी ११ वाजता सभा होणार आहे. दुपारी ३ वाजता मारूती मंदीर चौक, तळेगाव दाभाडे येथे सभा होईल. सायंकाळी ६ वाजता पुणे शहरात सिंगड रस्त्यावर गंगाधाम इमारतीजवळ, खाऊगल्ली येथे सभा होणार आहे.पुण्यात एकच सभा व ती खडकवासला मतदारसंघात, याचा अर्थ पुणे लोकसभा मतदार संघ काँग्रेससाठी सोडला आहे का, असे विचारले असता तुपे म्हणाले, ‘पुणे आम्हाला द्यावे अशी आमची अजूनही मागणी आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे; मात्र त्यांच्याकडे गेला व त्यांनी कोणताही उमेदवार दिला तरी आघाडीच्या धर्मानुसार आम्ही त्याचे काम करणार व निवडूनही आणणार.’
राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा शनिवारी पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 6:23 AM