पुणे : आज ठरणार, उद्या ठरणार यावरून विविध राजकीय अंदाजांना ऊत आला असताना साताऱ्याच्या शरद पवार उपस्थित असलेल्या दोन दिवसांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष ठरण्याची शक्यता आहे.
८ व ९ मे रोजी प्रत्येक वर्षी प्रसिद्ध शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्थेची वार्षिक बैठक असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष असून अजित पवार आणि सुप्रिया सुळे या संचालक मंडळावर आहे. यावर्षीही उद्यापासून दोन दिवसीय बैठक होणार आहे. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे पवार काही दिवस विश्रांती घेत असले तरी रयतçच्या बैठकीला मात्र ते हजर राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. तिथेच पुण्याच्या शहराध्यक्ष पदावर चर्चा होऊन आगामी दोन ते तीन दिवसात निर्णय जाहीर केला जाईल. यापूर्वीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण या सलग दुसऱ्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या असून शहराला नवा शहराध्यक्ष मिळणार आहे. जयंत पाटील यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली असून त्यानंतर काही दिवसात राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करू असे त्यांनी सांगितले होते.
त्याआधी सुमारे महिन्याभरापासून पुण्याच्या शहराध्यक्षपदाचे घोंगडे भिजत आहे. या पदासाठी अनेक जण इच्छूक असून आपापल्या गॉडफादरच्या माध्यमातून अनेकांनी सेटिंग लावण्याचा प्रयत्नही केला. त्याला कोणतेही यश मिळत नसून पक्षातर्फे अधिकृत रित्या कोणतीही चर्चा करण्यात येत नाहीये. त्यामुळे वैतागलेल्या अनेकांनी या शर्यतीतून माघार घेतली आहे. सध्या प्रामुख्याने माजी महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दीपक मानकर, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांची नावे अधिक चर्चेत आहेत. अर्थात पुणे शहराबाबत अजित पवार यांचा शब्द अंतिम असून ते म्हणतील त्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने योग्य आणि ताकदवान शहराध्यक्ष निवडण्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचा भर असणार आहे.