पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीचे छात्र हे देशांतील युवकांसाठी आदर्श आहेत भारतीय सीमा, शांतता आणि समृद्धीचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. प्रबोधिनीतून आतापर्यंत उत्तीर्ण झालेल्या अधिका-यांनी जे शौर्य गाजवले आहे त्याची परंपरा तुम्ही पुढे न्यावी. प्रबोधिनीचे 'सेवा परमो धर्म' कडेटनी आपल्या मनावर बिंबवून घ्यावे आणि त्यानुसार देशसेवा करावी. असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करतानाच प्रबोधिनीचे छात्र देशातील युवकांचे आदर्श आहे , असे गौरवोद्गार एनडीएच्या छात्रांप्रती काढले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा बुधवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) खेत्रपाल मैदानावर उत्साही आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी कोविंद यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी करून छात्रसैनिकांनी दिलेली मानवंदना स्वीकारली. याप्रसंगी भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा, इंटिग्रेटेड आर्मी स्टाफ चे प्रमुख लेफ्टनंट जनरल सतीश दुआ, सैन्याच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, प्रबोधिनीचे प्रमुख एअर मार्शल आय. पी. विपीन, डेप्युटी कमांडन्ट रिअर अॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्रबोधिनीचे प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला यांच्यासह सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी, राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, छात्रसैनिकांचे पालक उपस्थित होते.कोविंद म्हणाले, सैन्याचा तिन्ही दलाचा प्रमुख म्हणून या समारंभात उपस्थित राहणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आतापर्यंत सियाचीन, काश्मीर, लडाख अशाविविध ठिकाणी भेट देऊन सैन्याची कामगिरी जवळून पाहिली आणि ती अतिशय चांगली आहे, असे मला मनापासून वाटते. प्रबोधिनीचे 'सेवा परमो धर्म' कॅडेटने आपल्या मनावर बिंबवून घ्यावे आणि त्यानुसार देशसेवा करावी. साठ पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेल्या आणि देशासाठी उत्तमोत्तम अधिकारी दिलेल्या एनडीए सारख्या संस्थेमधून पदवी प्राप्त करणे ही स्नातकांसाठी अभिमान बाळगावा अशीच गोष्ट आहे. कोणत्याही दलातील गणवेशधारी सैनिक हा संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असतो, सैनिकांना प्रत्येक ठिकाणी सन्मानच मिळत असतो. देशाच्या सीमा सुरक्षित करण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही सैनिकांचे काम अव्दितीय असते. सैनिक केवळ शत्रूंशीच सामना करत नाहीत, तर सियाचीन, लडाख सारख्या ठिकाणी निसर्गाशीही सैनिकांना सामना करावा लागतो. सर्व आपत्तींशी सामना करत देशाचे रक्षण करणा-या सैनिकांचा सर्वांनाच अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
.................... एनडीएचा १३४ व्या तुडकीचा शिस्तबद्ध दिमाखदार दीक्षांत सोहळा तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणा-या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेह-यावर झळकणारा आत्मविश्वास... अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३४ वा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा बुधवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला. यावेळी अकॅडमी कॅडेट अक्षत राज याने सर्व शाखांमध्ये प्रथम येत राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर छात्रसैनिक सोहेल इस्लाम याने सर्व शाखांमध्ये दुसरा येत रौप्य पदकाचा सन्मान मिळविला. अली अहमद चौधरी याने तिसरे स्थान पटकावत कांस्य पदक मिळविले. ‘किलो’ स्क्वॉड्रनला ‘चीफ आॅफ स्टाफ बॅनर’ पुरस्कार मिळाला. विजेत्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संचलनात एकुण ३४४ कॅडेट सहभागी झाले होते. यातील २३८ छात्र लष्कराचे, २६ छात्र नौदलाचे आणि ८० छात्र हवाईदलातील होते. याशिवाय अफगाणिस्थान, भूतान , किरगीजस्थान, लाओस, नायजेरिया, मालदिव, तजाकीस्थान येथील १५ छात्रांचाही संचलन सोहळ्यात समावेश होता. ........................................
सुखोई, मिराज विमानांनी दिली मानवंदनाराष्ट्रीय संरक्षण प्रबोधितीतून बाहेर पडणा-या छात्रसैनिकांना भारतीय हवाई दलातील सर्वाधिक आधूनिक आणि वेगवान अशा ‘सुखोई ३०’, आणि ‘मिराज’ या विमानांनी थ्री फॉरमेशनमध्ये येत मानवंदना दिली. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. .........................
लहाणपणापासून लष्करात येण्याची ईच्छा माझे वडील हे लष्करातून सुभेदार म्हणून निवृत्त झाले आहे. यामुळे मी लहाणपनापासून लष्करी अधीकारी पाहत होतो. त्यामुळे लष्करात अधिकारी व्हायचे हे स्वप्न होते. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झाल्यामुळे मी ही परीक्षा पास होऊ शकलो. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनितील तीन वर्षांचे प्रशिक्षण खूप खडतर होते. यामुळे शारिरिक मानसिकरित्या आम्ही सक्षम झालो. मी माझ्या आई वडिलांचे आणि भावाचे खुप आभार मानतो. त्यांच्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी हे तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करू शकलो, अशी भावना आसाम येथील मुळ असलेला कांस्य पदक विजेता अली अहमद चौधरी याने व्यक्त केले.---------------वडिलांचे स्वप्न केले पूर्णलहाणपणी इंजिनिअर व्हायचे होते. पण वडील लष्करात होते. मी सुद्धा लष्करात अधिकारी होवून त्यांची ईच्छा पूर्ण करावी अशी त्यांची ईच्छा होती. यामुळे मी सुद्धा लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. एनडीएमध्ये येण्यासाठी मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले. आई वडीलांचे प्रोत्साहान, एनडीएतील ड्रील प्रशिक्षक तसेच वर्गातील उत्साद यांच्या मार्गदर्शनामुळे मी माझे येथील तीन वर्ष यशस्वी पणे पुर्ण करू शकलो. आजच्या संचलन सोहळळ्याचे नेतृत्व करतांना खूप आनंद होत आहे. माझ्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण आहे. मी आर्मी कॅडेड असल्याने इंडीयन मिलीटरी अॅकडमीत जाणार असून त्यानंतर पायदळात दाखल होणार आहे, अशी भावना आसाम येथील मुळचा तसेच आजच्या संचलन सोहळ्याचे नेतृत्व करणारा रौप्य पदक विजेता सोहेल इस्लाम याने व्यक्त केली. -------- राष्ट्रपदी सुवर्ण पदकाचा मानकरी ठरल्याने समाधानीराष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरल्याने आज मला खूप समाधान मिळाले आहे. हे मी माझ्या आईवडीलांमुळे शक्य करू शकलो. त्यांनी मला या प्रतिष्ठीत संस्थेत येण्यास परवानगी दिली आणि मला नेहमी प्रोत्साहित केले. या ठिकाणी आल्यावर येथील प्रशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. तीन वर्षात ऐकी, शिस्त आणि टीम स्पीरीट शिकलो. आर्मी कॅडेट असल्यामुळे भारतील लष्करात दाखल व्हायचे आहे, अशी भावना बिहार येथील चंपारण्य येथीलमुळ अससलेला तसेच राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी कॅडेट अक्षत राज यांनी व्यक्त केली.