संस्थांचा नव्हे गुणवत्तेचा विस्तार करण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 08:31 PM2019-12-16T20:31:44+5:302019-12-16T20:32:55+5:30
राज्यातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये मी काम करतो. गेल्या काही वर्षात आपण सर्वांनीच संस्थांचा विस्तार केला, मात्र आता गुणवत्तेचा विस्तार करण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
पुणे : राज्यातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये मी काम करतो. गेल्या काही वर्षात आपण सर्वांनीच संस्थांचा विस्तार केला, मात्र आता गुणवत्तेचा विस्तार करण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळांचे डॉ. सायरस पुनावाला व विलू पुनावाला असे नामकरण पवार यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी झाले.
सिरम इन्स्टिट्यूटचे डॉ. सायरस पुनावाला, आदर पुनावाला, संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती तसेच अन्य पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सायरस पुनावाला हे पवार यांचे शाळा तसेच महाविद्यालयातील सहाध्यायी. त्यांच्या काही आठवणी सांगत पवार यांनी या कार्यक्रमात रंगत आणली. ते म्हणाले, शाळा, महाविद्यालयात आम्ही मजा केली. शिक्षणात फार नैपुण्य दाखवू शकलो नाही. चार वर्ष लागतात तिथे आम्हाला पाच वर्षे लागली. मात्र नंतर स्वत:हून निवडलेल्या क्षेत्रात आम्ही नाव मिळवले. एका मित्राचे उत्पादन आज जगातील १७० देशांमध्ये वापरले जाते याचा आनंद आहे.
कॅम्प एज्युकेशनमध्ये प्रख्यात साहित्यिक आचार्य अत्रे १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. बारामतीहून येताना आत्ता मुद्दाम अत्रे यांच्या सासवडवरून आलो. ज्यांच्या शाळेत जायचे त्यांच्या गावातून जावे असा विचार त्यामागे होता असे सांगत पवार यांनी अत्रे यांच्यामुळे जिथेजिथे मराठी माणूस आहे तिथे कॅम्प एज्युकेशनचे नाव पोहचले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, तेलगू माणसांनी काढलेली शाळा म्हणून ही शाळा प्रसिद्ध होती. संस्था चालकांना संस्थेचा अजून विस्तार करायचा आहे. सायरस यांनाही त्यांना मदत करण्याची इच्छा आहे. तसे त्यांनी आत्ताच स्पष्ट केले. आत्ताच्या विद्यार्थ्यांचे गूण पाहिले की आनंद होतो, त्याचबरोबर गूण देण्याची पुर्वीची पद्धत बदलली आहे की याचीही शंका येते.
९६ टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्याला बाहेरच्या जगात कोणत्याही समस्येला तोंड देता येते किंवा नाही हे महत्वाचे आहे.संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी म्हणून माजी आमदार उल्हास पवार, शाम राजोरे, नगरसेवक दिलीप गिरमकर, अॅड. प्रताप परदेशी, डॉ. यशवंत तावडे, समृद्धी लिंबोरे, श्री. मुल्ला यांचा गौरव करण्यात आला. कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांनी प्रास्तविक केले. मुख्याध्यापिका श्रीमती मुळगावकर यांनी आभार व्यक्त केले.
शरद पवार हे पंतप्रधानपदासाठी अत्यंत योग्य : सायरस पुनावाला
सायरस पुनावाला म्हणाले, शरद पवार हे पंतप्रधानपदासाठी अत्यंत योग्य आहेत, मात्र काँग्रेसच्या व एकूणच राजकारणात त्यांचे ते पद राहिले. तेच या पदासाठी सर्वाधिक पात्र आहे. माझ्यासह त्यांच्या सर्वच मित्रपरिवाराची ते पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा आहे. त्यांच्यामध्ये एक उत्कृष्ट प्रशासक आहेच शिवाय या पदासाठी लागणारे अन्य सर्व गूणही त्यांच्यात आहेत.