नितीन आगेच्या न्यायासाठी मंत्रालयावर धडकणार मोर्चा; पुण्यातील विश्रामगृहावर झाली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:56 PM2017-12-06T12:56:30+5:302017-12-06T13:02:16+5:30
अहमदनगर, खर्डा गावातील अल्पवयीन तरुण नितीन आगे याची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी लवकरच विविध संस्था-संघटनांच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
पुणे : अहमदनगर, खर्डा गावातील अल्पवयीन तरुण नितीन आगे याची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी तसेच आॅनर किलिंग व जातीय धार्मिक हिंसाचाराच्या घटनांतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी लवकरच विविध संस्था-संघटनांच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
पुणे येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल आॅम्वेट विशेष उपस्थित होत्या. रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, अश्विन दोडके, भारिप बहुजन महासंघाचे प्रा. म. ना. कांबळे, मास मुव्हमेंटचे विजय जगताप, रिपब्लिकन सेनेचे युवराज बनसोडे, मातंग समाजाचे नेते अशोक लोखंडे, शंकर तडाखे, प्रकाश वैराळ, लोकजनशक्तीच्या आरती साठे, कॉ. भिमराव बनसोड, केशव वाघमारे, अंकुश शेडगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी रोजी मंत्रालयावर लक्षावधी लोकांचा धडक मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याबाबत नियोजनासाठी राज्यव्यापी बैठक रविवारी (दि. १७) मुंबई येथे घेण्यात येणार आहे.
नितीन आगे हत्याकांड खटल्यात अॅट्रॉसिटी अॅक्टमधील तरतुदीनुसार विशेष न्यायालयाची स्थापना न करणे तसेच विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती न करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेवून राजीनामा द्यावा, तसेच या खटल्याची फेरतपासणी व सुनावणी व्हावी आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.