पुणे (मंचर) : शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या काकूवर पुतण्याने हत्याराने वार करुन तिचा निर्घृण खुन केला आहे. ही घटना जुन्नर येथे पहाटे ४.४५च्या दरम्यान घडली. संगीता देविदास साळवे,असे खुन झालेल्या महिलेचे नाव असून या प्रकरणी पुतण्या शिवाजी गेणू साळवे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मंचर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार देविदास साळवे यांनी मंचर पोलीसांत फिर्याद दिली आहे. साळवे त्यांची आरोग्य सेविका पत्नी संगीता व दोन मुले यांच्यासह साकोरी येथे राहण्यास आहेत . मंगळवारी रात्री त्यांची पत्नी घराच्या ओट्यावर असलेल्या कॉटवर झोपली होती. तर मुलगा राहुल व मुलगी त्रिवेणी घरामध्ये झोपले होते. देविदास यांनी आई आजारी असल्याने ते स्वतः बहिणीच्या घराच्या शेजारील रुममध्ये झोपले होते. आज पहाटे ४.४५ वा. घराच्या बाहेर आरडाओरडा झाला. साळवे यांनी बाहेरुन पाहिले असता त्यांचा पुतण्या शिवाजी गेणू साळवे पत्नी संगीता हिस हत्याराने जोरजोरात मारत होता. यावेळी संगीता मला वाचवा, वाचवा असे मोठ्याने ओरडत होत्या. मात्र अंधाराचा फायदा घेवून शिवाजी पळून गेला.
जखमी संगीताने सांगितले की, पुतण्या शिवाजी हा मी झोपलेली असताना तेथे येवून मला त्याने झोपेतून उठविले व शारीरिक सुख दे असे म्हणाला. मी त्यास शारिरीक संबंध ठेवण्यास विरोध केला म्हणून त्याने चिडून जावून हत्याराने वार केले. दरम्यान जखमी तिच्या डोक्यास, तोंडास, डाव्या हातास, उजव्या पायास गंभीर जखमा झाल्या होत्या. वाहनातून तिला उपचारासाठी सुरुवातीला आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले .नंतर नारायणगाव येथील दवाखान्यात उपचार करुन पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्या उपचारापुर्वीच मरण पावल्याचे घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.