धुणीभांडी आणि मोलमजुरी करणाऱ्या 'ती'च्या हाती आता रिक्षाचे स्टेअरिंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 06:15 PM2020-02-06T18:15:28+5:302020-02-06T18:18:48+5:30

अनेक वर्षे धुणीभांडी अन् मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या हाती आता रिक्षाचे स्टेअरिंग येणार आहे.

new auto rickshaw stand for woman auto driver | धुणीभांडी आणि मोलमजुरी करणाऱ्या 'ती'च्या हाती आता रिक्षाचे स्टेअरिंग 

धुणीभांडी आणि मोलमजुरी करणाऱ्या 'ती'च्या हाती आता रिक्षाचे स्टेअरिंग 

Next

शीतल मुंडे
पुणे : पिंंपरी-चिंचवड शहरातील महिलांसाठीचे पहिले रिक्षा स्टँड निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुतळ्यासमोर गुरुवारी सुरू होणार आहे. महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पहिले रिक्षा स्टँड सुरू करण्यात येत आहे. अनेक वर्षे धुणीभांडी अन् मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या हाती आता रिक्षाचे स्टेअरिंग येणार आहे. रोजगारांच्या या नवीन संधीने अर्थिक स्वावलंबनाबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. 

महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक बाबा कांबळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या २० वर्षांपासून रिक्षा पंचायतीबरोबरच कष्टकरी महिलांसाठी काम सुरू आहे. राज्य शासनाने २०१७ ला रिक्षा परवाना सर्वांसाठी खुला केला. त्यामुळे केवळ मोलमजुरी व धुणीभांडीची कामे करून संसाराचा गाडा ओढणाºया महिलांना नवीन संधी उपलब्ध झाली. कष्टकरी संघटनेतील सुशिक्षित व धाडसी महिलांनी रिक्षाचालक म्हणून प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वेदांत ड्रायव्हिंग स्कूलने सामाजिक बांधिलकीतून कष्टकरी महिलांना मोफत रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण दिले.   

  महिला रिक्षा स्टँडच्या अध्यक्षा सरस्वती गुजालोर म्हणाल्या की, आम्ही सर्व महिला याअगोदर धुणीभांडी, मोलमजुरी, साफसफाईची कामे करीत होतो. मात्र, रिक्षा चालविण्याची संधी मिळाल्याने आम्ही स्वत:च्या पायावर उभे राहत आहोत.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले की, ' रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाताना महिलांना सुरक्षित वाटत नाही. महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी महिला रिक्षाचालक ही संकल्पना राबविली आहे. आता निगडीत महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा स्टँड सुरू केले आहे. पुणे व पिंपरी शहरातील प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करीत आहोत'. 


आरटीओ अधिकाऱ्यांची मदत

  • पिंपरी-चिंचवड आरटीओ विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील व सुबोध मिडसीकर यांना महिला रिक्षाचालकांची संकल्पना सांगितली. त्यांनीही सर्व महिलांना तातडीने शिकावू परवाना उपलब्ध करून दिला. त्यानंतर महिलांनी रिक्षा चालविण्याचा सराव केल्यानंतर लायसन, बॅच व परमिट त्वरित मिळाले. मुद्रा योजनेतून १०० महिलांना रिक्षा खरेदीसाठी संपूर्ण कर्ज उपलब्ध करून दिले. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून विविध भागात कष्टकरी महिला रिक्षाचालक म्हणून पिंपरी-चिंचवडच्या विविध भागात प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. 
  • महिलांसाठी हक्काचे रिक्षा स्टँड नसल्याने त्यांना इतर ठिकाणी थांबण्यास मज्जाव केला जात होता. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा स्टँड शहराचे पश्चिमद्वार असलेल्या भक्ती-शक्ती चौकात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असे निगडी येथे सुरू होणाऱ्या महिला रिक्षा स्टँडचे नाव आहे. 

Web Title: new auto rickshaw stand for woman auto driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.