बसस्टॉप स्वच्छ करण्याची नवी आयडिया; पीएमपीच्या फिटरने बनवलं थेट फिरतं 'वॉशिंग सेंटर'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 05:23 PM2023-01-29T17:23:47+5:302023-01-29T17:23:56+5:30
फिटरने अवघ्या तीन दिवसात बनवलेले हे वॉशिंग सेंटर सध्या पीएमपीत कौतुकाचा विषय ठरतोय
पुणे : बीआरटी मार्गावरील अस्वच्छ बसथांबे स्वच्छ करण्यासाठी पीएमपीच्या फिटरने फिरते वॉशिंग सेंटर बनवले आहे. अवघ्या तीन दिवसात त्यांनी बनवलेले हे वॉशिंग सेंटर सध्या पीएमपीत कौतुकाचा विषय ठरत आहे. पिंपरी आगारात कार्यरत असलेले बेंच फिटर बाबासाहेब मुलाणी यांचे देखील पीएमपी प्रशासनाद्वारे कौतुक करण्यात आले.
अनेक यांत्रिकी बाबींशी संलग्न काम करणारे कर्मचारी हे कल्पकता लढवून आपल्या परीने कामात सोपेपणा आणण्यासाठी नावीन्यपूर्ण गोष्टी करत असतात. बीआरटी मार्गावरील अस्वच्छ बसथांबे स्वच्छ करण्याच्या अडचणी दूर करण्यासाठी पिंपरी आगाराचे आगार व्यवस्थापक भास्कर दहातोंडे आणि पिंपरी आगार अभियंता राजकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब मुलाणी यांनी १ एचपी मोटर, २ हजार लीटर पाण्याची टाकी व अन्य टाकाऊ साहित्यापासून सर्व्हिस व्हॅन मध्ये ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार केले आहे.
हे वॉशिंग सेंटर बनवण्यासाठी कोणते पार्ट वापरायचे ? त्याची रचना कशी करायची ? याचा अभ्यास करून त्यांनी एक डिझाईन तयार करून पार्ट्स बनवून घेतले आणि ते सर्व्हिस व्हॅन मध्ये जोडले. सिंगल फेज विजेवर चालणारी मोटर जोडून ३ दिवसांच्या प्रयत्नानंतर हे ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार झाले आहे. हे फिरते वॉशिंग सेंटर बनवल्याबद्दल फिटर बाबासाहेब मुलाणी यांचे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार – पवार यांनी कौतुक केले.