कोरोनावरील दमदार विजय अन् कुटुंबातील माणसांचं महत्व उलगडणारा हा नवा 'मुळशी पॅटर्न'..!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 02:19 PM2020-09-26T14:19:27+5:302020-09-26T14:34:57+5:30
वयाच्या ८७ व्या वर्षी मधुमेह व उच्च रक्तदाब असूनही कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर केली मात..
जयवंत गंधाले-
पुणे : कोरोना म्हटलं तरी छातीत धडकी भरली जातेय अशी काहीशी परिस्थिती सगळीकडे आहे. माणुसकी देखील बंधने आणि भीतीत बंदिस्त झाली आहे.या चिंताजनक परिस्थितीत प्रत्येक जण कोरोना संकटांचा सामना करताना हवालदिल अवस्थेत जगतोय. पण या सगळ्या अवघड समयी हा एक प्रसंग असा आहे जो तुम्हाला प्रचंड उमेद तर देईलच शिवाय उत्तुंग आणि घट्ट नातेसंबंधांचं दर्शनसुद्धा घडवेल. वयाच्या ८७ व्या वर्षी कोरोनाला धोबीपछाड देत घरी परतलेल्या एका धीरोदात्त वयोवृद्ध महिलेचं अन् त्याचसोबत कुटुंबातील एका आईचं, सासूचं आणि आजीचं अनन्यसाधारण महत्व सांगत अलगद डोळ्यांच्या कडा पाणवणारा हा अनोखा 'मुळशी पॅटर्न'...
...तर हे कुटुंब आहे मुळशी तालुक्यातील भुकूम गावाजवळच्या आंग्रेवाडीचे...पै.गोविंद आंग्रे यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाई पंढरीनाथ आंग्रे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी मधुमेह व उच्च रक्तदाब असूनही कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर मात केली. सिम्बॉयसिस हॉस्पिटलमधून आंग्रेवाडीतील घरी आगमन होताना त्यांच्या कुटुंबाने व सुनेने जे स्वागत केलं ते समाजाला दिशादर्शक,प्रेरणादायी व आदर्शव्रत असे आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान गाजतोय. त्यात हिराबाई गाडीतून उतरल्यावर दोन नातींनी केलेली फुलांची उधळण, रांगोळीच्या पायघड्या हिराईंच्या सुनबाई निर्मलाताई गोविंद आंग्रे यांनी आश्रू भरल्या डोळ्यांनी औक्षण केलं.ओवाळून झाल्यावर निर्मलाताईंनी दर्शन घेतलं. सासूबाईंच्या गळ्यात हार घातल्यानंतर सून निर्मलताईंनी आलिंगन देत प्रेमाने मिठी मारली...हे दृश्य चित्रपट किंवा मालिकांच्या ड्रामेबाजीपेक्षा खूपच श्रेष्ठ आणि हृदयस्पर्शी होतं. इतका नितांत आदर, निर्मळ प्रेम पाहून संपूर्ण सोशल मीडिया भावुक झाला नसता तरच नवल..
सध्या कुटुंबात आई वडील यांना सन्मापूर्वक वागणूक दिली जात नाही. तसेच दोघात तिसरा किंवा नोकरी आणि व्यवसायातल्या धावपळीचे कारण देत त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याकडे आजच्या तरुण पिढीचा अधिक कल असतो. मात्र त्याने कुटुंबात कधी न भरून येणारी पोकळी निर्माण होते आहे. कोरोनाच्या काळात तर कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचे महत्व अजून अधोरेखित होत आहे. त्यामुळे या प्रसंगातून कुटुंबातील माणसांचं महत्व,प्रेम, आदर सर्वांना दुरावत चाललेल्या नात्यांच्या जवळ घेऊन जाणारा असा आहे.
आमच्या आजींना ५ मुली असताना मला त्या पोटच्या ६ व्या मुलीप्रमाणे जीव लावतात. त्यांना उच्च रक्तदाब,मधुमेह असताना त्यांनी कोरोनासारख्या महाकाय रोगावर मात करुन त्या घरी परतल्या. खरोखरच त्यांची पुण्याई कामाला आली. बंगला, गाडी ,पैसा,संपती ऐश्वर्य असले म्हणून तो मोठा होत नाही त्यासाठी लहानापासून वयस्कर लोकांनी भरलेलं कुटुंब पाहिजे. त्यामुळे आम्ही स्वत:ला खरे भाग्यवान समजतो - निर्मला आंग्रे,सून