पुणे : पोलीस मदतीसाठीची डायल ११२ ही योजना पुण्यात ८ सप्टेंबर २०२१ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली असून त्यामुळे नागरिकांना आता अधिक वेगाने सरासरी ७ मिनिटांमध्ये पोलीस मदत मिळत आहे.
महाराष्ट्रातील रहिवाशांच्या सेवेसाठीच्या एकाच क्रमांकावर सर्वप्रकारची मदत मिळावी, या हेतूने ११२ डायल ही योजना सुरू केली आहे. तक्रारदार यांची तक्रारी कॉल सर्व प्रथम नवी मुंबईतील केंद्राला जातो. तेथे तक्रारीसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन तो कॉल संबंधित जिल्ह्याला पाठविला जातो. तक्रार पाहून त्यावेळी तेथून जवळ असलेल्या पोलीस मार्शलला त्याची माहिती पाठविली जाते. मार्शल कॉल्सची पूर्तता करुन त्याची माहिती देतो, हे सर्व ऑनलाईन होते.
पूर्वी १०० नंबर वर कॉल केला असता तक्रारदार यांचे लोकेशन कळत नसे परंतु, डायल ११२ प्रणालीवर कॉल केला असता तक्रारदार याचे लोकेशन समजते. त्यामुळे तक्रारदार यांना तत्काळ मदत मिळते.
दररोज ३०० कॉल्स
पुणे पोलीस आयुक्तालयात सर्व तांत्रिक सुविधांसह सुसज्ज असे डायल ११२ चे नियंत्रण कक्ष उभारलेले आहे. डायल ११२ प्रणालीस जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून दररोज जवळपास ३०० कॉल्सची वेळेत पूर्तता करण्यात येत आहे.
५१ चारचाकी १०७ दुचाकी
डायल ११२ प्रणाली सुरळीत कार्यरत ठेवण्याकरीता ५१ चारचाकी व १०७ दुचाकीवर असे एकूण १५८ वाहनांवर डायल ११२ चे डिव्हाईस बसविण्यात आले आहेत. यामध्ये २० नवीन चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आलेली आहे. याप्रणाली संदर्भात ६ अधिकारी व जवळपास ५०० पोलीस अंमलदार यांना पुणे व मुंबई येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्षात वातानुकुलित यंत्रणा, अधिकारी व पोलीस अमंलदार यांच्या बसण्याची व्यवस्था आदी बाबींचे अत्याधुनिक करणे सुरू आहे.