पुणे : गिफ्ट पार्सल पाठविले असल्याचे सांगून त्याद्वारे लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या परदेशी टोळीतील नायजेरियनला सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. रॉबिनहूड ओकोह (वय ३९, रा. दिल्ली) असे त्याचे नाव आहे.
परदेशी टोळीतील सायबर चोरटे फेसबुकद्वारे फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून महिलांशी मैत्री वाढवितात. अमेरिका, लंडन इत्यादी देशांतील असल्याचे भासवून स्वत: डॉक्टर किंवा पायलट असल्याची ओळख करून देतात. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीपूर्ण चॅटिंग सुरू होते. काही दिवसांनी ते मौल्यवान पार्सल (दागिने, पैसे इत्यादी) पाठवीत असल्याचे सांगतात. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेस विविध मोबाइलवरून फोन करून कस्टम विभाग, दिल्ली येथून बोलत असल्याची बतावणी करून पार्सल सोडविण्याचे आमिष दाखवतात. पार्सल क्लिअरन्स, जीएसटी, आयएमएफ व मनी लॉड्रिंग प्रमाणपत्र अशी कारणे सांगून त्यासाठी या महिलेस वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडतात. तसेच अटकेची भीती दाखवून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जाते. अशा प्रकारे हडपसरमधील एका महिलेची ११ लाख ४० हजार ९०० रुपयांची फसवणूक केली होती.
या गुन्ह्यातील आरोपींनी वापरलेले इन्स्टाग्राम आयडी, व्हॉट्सॲप क्रमांक तसेच वापरण्यात आलेले बँक खाती याची सर्व माहिती प्राप्त करून तांत्रिक तपास केल्यावर आरोपी हा दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांचे पथक दिल्ली येथे जाऊन तयांनी रॉबिनहूड ओकोह याला ताब्यात घेतले. त्या नायजेरियनकडून ४ मोबाइल, १ हार्डडिस्क, २ पेनड्राइव्ह, १५ सीम कार्ड, ७ डेबिड कार्ड व इतर साहित्य जप्त केले आहे. लष्कर न्यायालयाने त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त विजय पळसुले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनुराधा भोसले, पोलिस अंमलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, बाबासाहेब कराळे, नीलेश लांडगे, सोनाली चव्हाण, संदेश कर्णे, शाहरुख शेख, नितीन चांदणे यांनी केली आहे.