लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: प्रदेश काँग्रेसच्या आदेशाने जिल्हा काँग्रेस भवनमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोरोना रूग्ण सहायता केंद्रात दिवसभरात १०० पेक्षा जास्त फोन येतात. त्यातले बहुसंख्य फोन एकतर रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून द्या किंवा मग बेड, ऑक्सिजन बेड मिळवून द्या असेच असतात.
काँग्रेस भवनच्या एका कक्षात हे केंद्र सुरू आहे. विद्यार्थी काँग्रेस (एनएसयूआय) व युवक काँग्रेसचे (यूथ काँग्रेस) भूषण रानभरे, विशाल मलके, अविनाश सोळुंके, सौरभ अमराळे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते तिथे असतात. शहर सरचिटणीस रमेश अय्यर, सचिन आडेकर केंद्राचे समन्वयक आहेत.
सकाळी ९ ते रात्री उशिरापर्यत हे केंद्र सुरू असते. बहुसंख्य फोन हे इंजेक्शन, बेड, जादा बिल, खर्च यासंदर्भातच असतात, असे फोन कॉल घेणाऱ्यांनी सांगितले.
पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पालिकेतील गटनेते आबा बागुल तसेच अन्य नगरसेवक प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्या माध्यमातून फोन करणाऱ्यांच्या अडचणीवर मार्ग काढण्यात येतो. त्यासाठी फोन कॉन्फरन्स, वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना फोन केले जातात.
बेड मिळण्याच्या बाबतीत महापालिकेने किमान एकाच ठिकाणी सर्व शहराची माहिती मिळावी याची व्यवस्था करावी. असे या केंद्रातील कार्यकर्त्यांनी आवर्जून सांगितले. तंत्रज्ञानाच्या साह्याने हे अगदी सहज शक्य असतानाही का केले जात नाही, असा प्रश्न त्यांनी केला. केवळ या एका व्यवस्थेने अनेक पुणेकरांचा त्रास वाचेल, असे हे कार्यकर्ते म्हणाले.
-