‘निर्भया' ला मिळाला न्याय, नराधमाला फाशीची शिक्षा; कोथुर्णे गावातील चिमुकलीचे खून प्रकरण
By नम्रता फडणीस | Published: March 22, 2024 06:24 PM2024-03-22T18:24:37+5:302024-03-22T18:28:05+5:30
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीच्या आईला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली....
पुणे : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील अवघ्या साडेसहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करत तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली. पुण्याच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी (दि. २२) या गंभीर गुन्ह्यात नराधमाला फाशीची शिक्षा सुनावत ‘निर्भया’ला खऱ्या अर्थाने न्याय दिला. तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीच्या आईला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
आरोपीला काय शिक्षा होणार, फाशी की जन्मठेप? याकडे शुक्रवारी न्यायालयात हजर असलेले पीडितेचे वडील आणि गावकऱ्यांचे लक्ष लागले होते. शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयाने आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले. पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. मी हा गुन्हा केलाच नाही, असे चोवीस वर्षीय आरोपी सांगत होता. न्यायालयाने त्याला गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगत
राज्याला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घेत विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय २४) असे फाशी झालेल्या नराधमाचे नाव आहे, तर सुजाता महिपती दळवी (वय ४८, दोघेही रा. कोथुर्णे, पवननानगर, मावळ) असे त्याच्या आईचे नाव आहे. याबाबत चिमुकलीच्या वडिलांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
ही धक्कादायक घटना २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी घडली होती. त्या दिवशी नागपंचमीच्या निमित्ताने शाळेला सुटी असल्याने चिमुकली घरासमोर खेळत होती. अचानक ती बेपत्ता झाल्याने गावात शोधाशोध सुरु झाली. पोलिसांनी गावात शोधमोहिम राबविली. दुसऱ्या दिवशी (३ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे झुडुपात या मुलीचा मृतदेह आढळला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवित चोवीस तासांच्या आत चिमुकलीच्या शेजारी राहणाऱ्या तेजस दळवीला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात कलम ३६३, ३७६, ३७६ ए, ३७६ एबी, ३०२ आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम चार व पाचनुसार गुन्हा सिद्ध झाला. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले.
विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी एकूण २९ साक्षीदार तपासले. चिमुकलीला आरोपीसोबत पाहणारी गावातील महिला, मुलीचे शवविच्छेदन आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि आरोपीच्या घर झडतीच्या वेळी उपस्थित सरकारी पंच यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिचा खून केला असून, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या निवाड्याचे दाखले दिले, तसेच दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ एबी तरतुदीत झालेल्या बदलांचा आधार घेत आरोपीला ‘डेथ पेनल्टी’ देण्याची मागणी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले.
अशी केली हत्या
आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते, तसेच हातात सुरा असलेले फोटो तो समाजमाध्यमांवर टाकायचा. घटनेच्या दिवशी आरोपीने घराशेजारी खेळत असलेल्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेत मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखविले आणि बलात्कार केला. त्याला विरोध केल्याने आरोपीने चिमुकलीचा गळा आवळला. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे समजून तिला मोहरीत टाकले. मात्र, तिचा आवाज आल्यावर आरोपीने चाकूने तिच्या गळ्यावर चार वेळा वार करून तिचा निर्घृण खून केला. तिचा मृतदेह पोत्यात टाकून घराच्या पाठीमागे पुरला. त्यावर फांद्या लावून त्याने गावातून पुण्याच्या दिशेने पोबारा केला. दुसऱ्या दिवशी तो थेट कामावर निघून गेला.