पुणे : व्हिसा संपूनही भारतात वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर पुणे पाेलिसांनी कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेले परदेशी नागरिक हे नायजेरीया या देशाचे असून ते पुण्यात वास्तव्यास हाेते. त्यांना काेंढवा भागातून ताब्यात घेण्यात आले.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमिवर गुन्हे शाखा व विशेष शाखेच्यावतीने परदेशी नागरिक तसेच अवैध हुक्का विक्री करणारे हाॅटेल बार चालक यांच्याविराेधात विशेष माेहीम हाती घेतली हाेती. त्यानुसार काल संध्याकाळी 4 च्या सुमारास काेंढवा पाेलीस स्टेशनच्या हद्दीत पाेलिसांकडून पेट्राेलिंग करण्यात येत हाेती. त्यावेळी काेंढव्यातील उंड्री भागातील स्काय हाईट्स या इमारतीमध्ये काही नायजेरियन नागरिक पासपाेर्ट व्हिसाची मुदत संपल्यानंतरही राहत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पाेलिसांनी तापसणी केली असता दाेन महिला व तीन पुरुष हे त्या साेसायटीमध्ये राहत असल्याचे समाेर आले. केंहिंद केटरिना, नामायाेब्मा रिताह, टाेनी अॅडजेमीओ, इक्वर जाॅर्ज ओसारमेन, दाईक चिडीएमेरे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे चाैकशी केली असता चारजण हे व्हिजाची मुदत संपूनही भारतात राहत असल्याचे समाेर आले. तर एकाजणावर दिल्ली येथे फसवुकीचा गुन्हा दाखल असल्याने त्याचा पासपाेर्ट दिल्ली काेर्टात जमा केलेला असल्याचे समाेर आले. या सर्वांना पाेलिसांनी पुढील कारवाईसाठी एफ आर ओ ब्रॅचच्या स्टाॅफकडे साेपविले आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पाेलीस आयुक्त अशाेक माेराळे, पाेलीस उप आयुक्त बच्चन सिंह, गुन्हे प्रतिबंधक शाखेचे सहायक पाेलीस आयुक्त शिवाजी पवार, अभियाेग विभागाचे सहायक पाेलीस आयुक्त विजय चाैधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक विजय टिकाेळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.