पुणे: ''आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही'' असे पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून संजय राठोड यांना 'क्लिनचिट' मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच आता त्यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली झाली आहे. मात्र याच दरम्यान संजय राठोड प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
पुण्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले.त्यात पूजा चव्हाण प्रकरणावर वळसे पाटील म्हणाले, शिवसेना आमदार संजय राठोड प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे क्लिन चिट देण्याचा संबंधच नाही.
पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे, राज्यात एकच खळबळ उडाली होती. तिच्या आत्महत्येला शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हेच जबाबदार असल्याचे बोलले जात होते. या आरोपामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर, आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे जबाब नोंदविला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात''आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही'' असे त्यांनी म्हटल्याची माहिती झोन पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे. तसेच, या प्रकरणाचा आमचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याने संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राठोड यांनी २८ फेब्रुवारीला दिला होता राजीनामा
राठोड यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता, मात्र विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं. मुंबईला येऊन २८ फेब्रुवारीला त्यांनी राजीनामा दिला होता.पूजा चव्हाणने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ दिसेनासे झाले होते.''