पिंपरी : संतसाहित्याची विटंबना झाली, म्हणूनच लेखक आणि प्रकाशकांच्याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करणारे आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. आनंद यादव यांना पायउतार करणारे आम्हीच वारकरी होतो. हे क्रौर्य नसून, संत साहित्याचे आध्यात्मिक शौर्य आहे. त्यामुळे सौजन्यांचे हिशेबनीस होण्यापेक्षा संतसाहित्य वाचून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, अशा कडव्या शब्दांत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे माजी प्रदेशाध्यक्ष, संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि संभाजीमहाराज मोरे (देहूकर) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात मोरे म्हणाले, ‘‘संतसूर्य कादंबरीमुळे तुकोबारायांसारख्या संत साहित्यिकांची विटंबना झाली होती. त्याबाबत वारकऱ्यांनी निषेध व्यक्त केल्यानंतर क्रौर्य आणि औदार्य यांचा विचार न करता सत्याला दंडवत घालत यादव यांनी संतसूर्य कादंबरी मागे घेतली. हा वैचारिक पराभव यादव यांना मान्य होता. ते स्वत: अध्यक्षपदावरून पायउतार झाले. हे वारकऱ्यांचे क्रौर्य नसून संतसाहित्याचे आध्यात्मिक शौर्य आहे. परंतु, क्रौर्याच्या अतर्क्य उनाड गप्पा मारणाऱ्या सबनीसांनी संतसाहित्य वाचून चिंतन करावे.उगाच वारकऱ्यांच्या आध्यात्मिक शौर्याला आव्हान देऊ नये. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊ माथा।।’ असे रोख-ठोक बोलणाऱ्या तुकोबारायांचे आध्यात्मिक शौर्य अभंगातून तपासून पाहावे. कारण तुकोबाराय म्हणतात, ‘‘मायबापाहून बहू मायावंत। करू घातपात शत्रुहूनि।।’’
प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी ‘संतसूर्य’ कांदबरीतून संत तुकाराममहाराजांचे चारित्र्यहनन केल्याचे संत तुकाराममहाराजांच्या वंशजांनी उघडकीस आणल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे यादव यांना कादंबरी मागे घ्यावी लागली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी यादव यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात कार्यक्रम झाला. त्या वेळी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक डॉ. आनंद यादव : जीवन आणि साहित्यगौरव विषयावरील परिसंवादात माजी साहित्य संमेलनाध्यक्ष सबनीस यांनी संतसाहित्यामध्ये क्रौर्य आहे का? असे विधान करीत वारकऱ्यांवर टीका केली. त्याला तुकोबारायांचे वंशज असणाऱ्या मोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.