पिंपरी : महापालिका निवडणूक पाच महिन्यांवर येऊन ठेपल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगरसेवक दाखल होऊ लागले आहेत. सत्ताधारी भाजपशी संलग्न अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी गुरुवारी मुंबईत प्रवेश केला. यावेळी, कुठल्याही पदाची अपेक्षा नसल्याचे बारणे यांनी म्हटलंय.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, संतोष बारणे,अभय मांढरे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, ऋषिकेश काशिद, योगेश साळुंखे, प्रविण बारणे, शहाजी लोखंडे, अक्षय बारणे, तुषार मोरे उपस्थित होते. बारणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत कैलास बारणे अपक्ष निवडून आले आहेत. चार सदस्यांचा मोठा प्रभाग असतानाही बारणे हे प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाणमधून अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी पाच अपक्ष नगरसेवकांची आघाडी केली. ही आघाडी सत्ताधारी भाजपशी संलग्न झाली. बारणे हे स्थायी समितीचे सदस्य देखील होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. पदाची कोणतीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे कैलास बारणे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ''ही तर सुरुवात आहे. भाजप आणि अन्य पक्षांतील नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. बारणे यांच्या पाठोपाठ एकेक करून पक्ष प्रवेश होतील.''