महागड्या विज्ञान खेळण्यांचे फॅड नकोच! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 09:00 AM2019-05-21T09:00:00+5:302019-05-21T09:00:02+5:30

मुलांना सुट्टीत सतत नवीन खेळणी आणून देण्याचा पालकांचा अट्टाहास असतो..

no fad of high rates scientific games ! | महागड्या विज्ञान खेळण्यांचे फॅड नकोच! 

महागड्या विज्ञान खेळण्यांचे फॅड नकोच! 

Next
ठळक मुद्देसध्या ऑनलाईन पध्दतीनेही विज्ञान खेळणी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढीस उन्हाळी सुट्टीमध्ये महागड्या विज्ञान खेळण्यांची पालक आणि मुलांमध्ये प्रचंड क्रेझ

- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : उन्हाळी सुट्टीमध्ये महागड्या विज्ञान खेळण्यांची पालक आणि मुलांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. विज्ञान खेळण्यांमधून मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळेल, हसत-खेळत शिकता येईल, असा त्यांचा समज झालेला असतो. प्रत्यक्षात तयार विज्ञान खेळणी, पुस्तकात दिल्याप्रमाणे ते जोडण्याचे तंत्र शिकताना मुलांची जिज्ञासा खुंटते, मुले साचेबध्द विचार करायला शिकतात, असे चित्र प्रत्यक्षात पहायला मिळत आहे. त्यापेक्षा घरगुती वस्तू, पारंपरिक खेळ यातून मुलांना खूप काही शिकायला मिळत असल्याचे निरिक्षण तज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे.
मुलांना सुट्टीत सतत नवीन खेळणी आणून देण्याचा पालकांचा अट्टाहास असतो. सध्या ऑनलाईन पध्दतीनेही विज्ञान खेळणी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढीस लागला आहे. मॅकॅनो, सायन्स किट, फ्लिंटो बॉक्स, सायंटिफिक कॅलक्युलेटर, ज्युनियर एनसायक्लोपिडिया, स्टेम फॉर्मर, मायक्रोस्कोप, इंजिनो इन्व्हेंटर, मॅथ्स पझल अशी विज्ञान खेळणी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झालेली पहायला मिळत आहे. या खेळण्यांची किंमत पाचशे रुपयांपासून दोन-तीन हजार रुपयांपर्यंत असते.
तयार विज्ञान खेळण्यांमुळे मुलांची जिज्ञासा खुंटत असल्याचे मत बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, ‘मी स्वत: विज्ञान खेळण्यांच्या विरोधात आहे. ‘ए’ सॉकेटमध्ये लाल वायर जोडा आणि ‘बी’ सॉकेटमध्ये निळी वायर जोडा की लाईट लागेल, अशा विज्ञान किट खेळताना मुले डोक्याचा नव्हे, केवळ डोळयांचा वापर करतात. आज्ञा पाळणे म्हणजे विज्ञान शिकणे नव्हे. चुकांमधून मुलांना शिकता आले पाहिजे. ‘ए’ची वायर ‘बी’ला जोडली तर काय होईल, असा विचार मुलांना करता यायला हवा. चित्रात दाखवल्याप्रमाणे गाडी तयार करण्यातून कसे विज्ञान शिकणार? खेळण्यांमधून मुलांची जिज्ञासा जागी झाली पाहिजे, चुका करण्याची संधी देणारे खेळणे त्यांना मिळाले पाहिजे, साचेबध्द विचार न करता कल्पनाशक्ती विविध माध्यमांतून आजमावता आली पाहिजे.’
-------------
जुने घड्याळ, तुटलेली खेळण्यातील कार, खराब चार्जर अशा घरगुती वस्तूंमधूनही मुले विज्ञान शिकू शकतात. महागड्या मॅकेनो खेळातील एखादा स्कू्र हरवला की पालक मुलांची ‘शाळा’ घेतात. स्क्रू हरवला तर त्याला काय पर्याय शोधून काढता येईल, याबाबत मुलांशी चर्चा केली पाहिजे. शाळा सुरु असताना जे करता येत नाही, ते करण्यासाठी सुट्टी असते. स्वत:हून त्यांना काहीतरी शिकू द्या, तसेच न शिकण्याचेही स्वातंत्र्य द्या. मुलांवर विश्वास ठेवा. त्याने माझे ऐकलेच पाहिजे, असा अट्टाहास नको. मुलाने श्याम व्हावे, अशी अपेक्षा ठेवण्याआधी आपण श्यामची आई आहोत का, हे पारखून पहा.
-राजीव तांबे-
...........
विज्ञान खेळण्यांची क्रेझ वाढत असताना मुले जुने खेळ मात्र विसरत चालली आहेत. आम्ही ‘चाईल्ड पार्किंग झोन’मध्ये मुलांना सागरगोटेसारखे पारंपरिक खेळ शिकवतो. जुन्या, पारंपरिक खेळांमधून मुलांची एकाग्रता, शांत स्वभाव वाढीस लागतो. ग्लासमधील बुडबुडे, काडेपेटीपासून विज्ञान खेळ, मॅगनेट अशा खेळांमधून मुले हसत-खेळत विज्ञान शिकू शकतात.
- विद्या साताळकर, संचालिका, बालविकासरंजन/चाईल्ड पार्किंग झोन

Web Title: no fad of high rates scientific games !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.