घरात कचरा नाही ना करत ? मग किल्ल्यांवर का करता ? स्थानिक महिलेचा संताप - ट्रेकिंग पलटण ग्रुपकडून प्लास्टिक कचरा संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:04 AM2021-02-22T04:04:24+5:302021-02-22T04:04:24+5:30
ट्रेकिंग पलटण ग्रुप, पुणे यांच्यातर्फे सिंहगडावर स्वच्छता मोहिम आखण्यात आली होती. त्यानिमित्त या ग्रुपसोबत चर्चा करताना तेथील परिसरातील स्थानिक ...
ट्रेकिंग पलटण ग्रुप, पुणे यांच्यातर्फे सिंहगडावर स्वच्छता मोहिम आखण्यात आली होती. त्यानिमित्त या ग्रुपसोबत चर्चा करताना तेथील परिसरातील स्थानिक महिला यावर बोलत होत्या. ‘‘आम्ही अनेकांना सांगतो की, प्लास्टिक इथं नका टाकू, तर तेच आम्हाला बोलतात की, तुम्हाला काय करायचे आहे ? तुमचे काय जाते ? असेही त्या महिलेने सांगितले. खरंतर हा संवाद गडकिल्ल्यांवरील कचऱ्याबाबत अतिशय बोलका आहे.
गडकिल्ले स्वच्छ आणि सुंदर ठेवावेत, यासाठी ट्रेकिंग पलटण ग्रुप काम करत आहे. या ग्रुपचे डॅा. सुरेश इसावे यांनी शिवजयंतीनिमित्त स्वच्छता मोहिम उपक्रम राबविला. ट्रेकींग पलटन पुणे ग्रुप २०१६ पासून विविध गडांवर प्लास्टिक मुक्त गड स्वच्छता अभियान राबवित आहे. शिवजयंती चे निमित्त साधून नुकतीच अतकरवाडी ते पुणे दरवाजा ही गडवाट (ट्रेकमार्ग) स्वच्छता मोहीम राबविली.
मागील आठवड्यात सिंहगडावरील घोड्याच्या पागेचे कचरायुक्त फोटो बघून ट्रेकिंग पलटन ग्रुपने दहा फेब्रुवारी रोजी घोड्याची पागा व पुणे दरवाजा परिसरातील प्लास्टिक गोळा केले. यात प्रा. संदीप चौधरी, अमोल गोरे, अथर्व ओक, देशना इसावे आणि प्रा डॉ सुरेश इसावे यांनी सहभाग घेतला होता.
त्याचवेळी गडवाटेवराही पडलेला प्लास्टिक कचरा निदर्शनास आला. तेव्हाच शिवजयंती ही गडवाट स्वच्छता करून साजरी करण्याचे ग्रुपने ठरवले होते. मोहिमेत ट्रेकींग पलटनचे प्रा. संदीप चौधरी, अमोल गोरे, खंडू दयाळ, ज्ञानेश्वर आर्णे, श्रीरंग गोरसे, ऋषिकेश जगताप आणि प्रा. डॉ. सुरेश इसावे यांनी श्रमदान केले.
------------
प्लास्टिकचा कचरा मोठा
शिवजयंतीला पहाटे गडवाटेने गडावर चढून छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून गडवाट उतरतांना प्लास्टिक गोळा केला. पाण्याच्या बाटल्या, फूड पँकेट्स, शितपेयेच्या बाटल्यांसोबत आणलेल्या पोत्यांत भरून अतकरवाडी येथे हॉटेल व्यावसायिककडे भंगारवालेना देण्यासाठी दिले.
तसेच डस्टबीन जुने होऊन मोडकळीस आल्या असून नव्या डस्टबीन बसवण्याची आवश्यकता व्यक्त केली.
---------