‘नो हॉर्न’वर आरटीओ करणार प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 04:47 PM2018-04-21T16:47:18+5:302018-04-21T16:47:18+5:30
राष्ट्रीय हरित लवादाने वाहनांद्वारे होणाºया ध्वनी प्रदुषणाबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
पुणे : प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने येत्या सोमवारी (दि.२३) रस्ते सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ध्वनी प्रदुषणास आळा घालण्यासाठी ‘नो हॉर्न प्लीज’ हे अभियान या दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.
फर्ग्युसन महाविद्यालयातील अॅम्फी थिएटर येथे आयोजित कार्यक्रमात सकाळी दहा वाजता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते या अभियानास सुरुवात होणार आहे. रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार शिवाजी आढळराव-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ असे घोषवाक्य घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने वाहनांद्वारे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हॉर्न न वाजविण्याचे फायदे आणि हॉर्न वाजविल्याने होणारे दुष्परिणाम वाहनचालकांना सांगण्यात येणार आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन या वेळी करण्यात येईल.
...................