ग्रामीण भागातील संचारबंदीबाबत तूर्त निर्णय नाही ; गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:12 AM2020-12-24T04:12:20+5:302020-12-24T04:12:20+5:30
पुणे : ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये मंगळवार (दि.२२) पासून रात्री संचारबंदी ...
पुणे : ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये मंगळवार (दि.२२) पासून रात्री संचारबंदी लागू केली आहे. तर ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. हे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले असले तरी प्रस्तावाला शासनाची मान्यता घ्यावी लागणार आहे. यामुळे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी बुधवारी ग्रामीण पोलिसांना संचारबंदी लागू करण्याची गरज आहे किंवा कसे या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान ख्रिसमस व ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात गर्दी होणाऱ्या ठिकाणी निर्बंध घालण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारी म्हणून राज्यातील महापालिकांच्या क्षेत्रात मंगळवारपासून (दि. २२) रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या संचारबंदीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार डाॅ.राजेश देशमुख यांनी बुधवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक व अन्य संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या व भविष्यातील संख्या यावर चर्चा केली. यात तूर्त तरी ग्रामीण भागात सरसकट संचारबंदी लागू करण्याचा प्रशासनाचा विचार नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.