पुण्यात बंद दरम्यान कोणत्याही मोर्चाला परवानगी नाही; नियम पाळण्याचे पोलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 09:20 PM2020-12-07T21:20:06+5:302020-12-07T21:23:06+5:30
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे.
पुणे : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या उद्याच्या (दि.८) भारत बंदला विविध राजकीय पक्ष, संघटनांची पाठिंबा दिला आहे. शहर पोलिसांनी कोणत्याही मिरवणुका, मोर्चांना परवानगी दिलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सर्व नियम पाळून बंद शांततेत पार पाडावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जर कोणी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे. कोणीही कायद्याचे उल्लंघन करु नये, यासाठी महत्वाच्या सर्व ठिकाणी पोलीस पथकाची नेमणूक केली आहे. पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे नागरिकांनी पालन करावे. पुणेकरांनी जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी. दुकाने बंद करणे अथवा कोणताही अनुचित प्रकार करु नये. कोणताही पक्ष, संघटनां यांना मोर्चा काढण्यास परवानगी दिलेली नाही. तसा प्रयत्न कोणी केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले. एकाच ठिकाणी थांबून निवेदन देण्यास परवानगी देण्यात आली आहे.
........
सर्व पक्ष, संघटनांच्या वरिष्ठ नेत्यांशी पोलिसांनी संवाद साधला असून कोणालाही मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. नागरिकांनी शांततेत बंद पार पाडावा. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
-अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे