पुणे : एरवी नागरिकांना छोट्या -मोठ्या गोष्टींसाठी दंडाची आकारणी करणाऱ्या महापालिकेवर प्रादेशिक परिवहन विभागाचा दंड भरण्याची वेळ आली आहे. पालिकेची शेकडो वाहने अनेक वर्षांपासून पासिंग न करताच रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात, शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या (महासंघ) वतीने आरटीओकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्याची तत्काळ दखल घेत आरटीओने पालिकेची विनापासिंग रस्त्यावर धावणारी चार वाहने जप्त केली. या कारवाईच्या निमित्ताने व्हेईकल डेपोचा उदासीन कारभाराचा नमुना समोर आला आहे. महापालिकेच्या कचरा वाहतूक व अन्य वाहतुकींसाठी छोटी-मोठी वाहने वापरली जातात. त्यासाठी पालिकेचा व्हेईकल डेपो नावाचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. या विभागाने त्यांच्याकडील वाहनांचे वेळच्या वेळी पासिंग करून घेणे, तसेच सुरक्षाविषयक मानके पूर्ण करणे आवश्यक आहे. पालिकेच्या ८९० वाहनांपैकी ५३० वाहने ही पासिंग झालेली असून, उर्वरित ३६० वाहने ही विनापासिंग रस्त्यावर धावत आहेत. यापैकी काही वाहनांचे, तर १९९८ पासून पासिंगच झाले नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नाहीत, तर बहुतांश वाहनांचे इंडीकेटर्स, हेडलाइट्स फुटलेल्या आहेत. टायर घासून गुळगुळीत झालेले आहेत. यासोबतच आरटीओच्या निकषांनुसार आवश्यक असलेले रेडियम (३ एम), स्पिड गव्हर्नर, रिफ्लेक्टर्सचा तर या वाहनांमध्ये पत्ताच नाही. रस्त्यावर बिनदिक्कत फिरणाºया या ‘किलिंग मशीन्स’ वर कारवाई होताना दिसत नाही. सर्वसामान्यांना बंधनकारक असलेले निकष शासकीय वाहनांना सोईस्कररीत्या का शिथिल केले जातात, असा सवाल जिल्हाध्यक्ष एकनाथ ढोले यांनी उपस्थित करीत या वाहनांवर कारवाईची लेखी मागणी केली होती. त्यानुसार आरटीओने या वाहनांवर कारवाईला सुरुवात केली असून सोमवारी चार वाहने जप्त करून आरटीओमध्ये लावण्यात आली. .......सर्वसामान्यांना लावण्यात आलेले निकष पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. प्रसंगी वाहन जप्त केले जाते. महापालिकेकडून या ना त्या कारणावरून सर्वसामान्यांना दंड आकारला जातो. परंतु, पालिकाच स्वत: नियमबाह्य पद्धतीने वाहने रस्त्यावर चालवित आहे. या वाहनांमुळे अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची? याबाबत व्हेईकल डेपो विभागाने गांभीर्याने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पुणे पालिकेच्या 350 वाहनांचे पासिंगच नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 12:49 PM
महापालिकेच्या कचरा वाहतूक व अन्य वाहतुकींसाठी छोटी-मोठी वाहने वापरली जातात. धक्कादायक माहिती : आरटीओने केली चार वाहने जप्त
ठळक मुद्देधक्कादायक माहिती : आरटीओने केली चार वाहने जप्त पालिकेचा व्हेईकल डेपो नावाचा स्वतंत्र विभाग कार्यरतशेकडो वाहने अनेक वर्षांपासून पासिंग न करताच रस्त्यावर धावत असल्याचे आले समोर