ठाणे शिवनेरीला वेळेचे वावडे ; प्रवाशांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:30 PM2019-12-13T23:30:00+5:302019-12-13T23:30:02+5:30
ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या मार्गावर आरामदायी शिवनेरी बस दर अर्ध्या तासाला..
पुणे : स्वारगेट बसस्थानकातून दर अर्ध्या तासाला शिवनेरी सोडण्यात येत असल्याचा एसटी महामंडळाकडून केला जात असलेला दावा फोल ठरत आहे. ठाण्याला सुटणाऱ्या शिवनेरी गाड्यांना विलंब होत असल्याची स्थिती आहे. शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी तर अर्ध्या तासाहून अधिक वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर बस किमान एक तास उशिराने येईल, असे प्रवाशांना सांगण्यात आले. त्याचवेळी दादरसाठी मात्र दोन अश्वमेध बस उभ्या होत्या.
स्वारगेट बसस्थानकातून दादरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अश्वमेध व शिवनेरी या गाड्या सोडल्या जातात. तर ठाणे प्रवासासाठी शिवनेरीसह काही शिवशाही व हिरकणी (निमआराम) या बस असतात. ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या मार्गावर आरामदायी शिवनेरी बस दर अर्ध्या तासाला सोडण्यात येते. तसेच हिरकणी बसही दर १५ ते ४५ मिनिटांनी सोडण्यात येत असल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून केला जातो. त्यानुसार ऑनलाईन बुकिंग सेवाही उपलब्ध आहे. मात्र, प्रत्यक्ष हे वेळापत्रक केवळ कागदावरच राहत असल्याचे दिसून येते. अनेकदा या गाड्या वेळेत सुटत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. याची पडताळणी करण्यासाठी शुक्रवारी स्वारगेट बसस्थानकात पाहणी करण्यात आली.
ठाणे शिवनेरीची बुकिंग खिडकी स्वतंत्र आहे. या खिडकी समोरच्या फलाटावर बस उभ्या राहतात. दुपारी ४ वाजता एक शिवनेरी बस ठाण्याकडे रवाना झाली. त्यामुळे दुसरी बस ४.३० वाजता सुटणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ही बस ४.२० वाजता फलाटावर लागली. ही बस लागल्यापुर्वी प्रवाशांनी बुकींगसाठी रांग लावली होती. बस आल्यानंतर १५ मिनिटांनी बुकींग सुरू झाले. ही बस ५ वाजून ५ मिनिटांनी म्हणजे अर्धा तास विलंबाने निघाली. यावेळी तिकीट खिडकीवर २५ ते ३० प्रवाशांची रांग होती. पुढची बस साडे पाच वाजेपर्यंत आली नाही. त्यावेळी बुकींग करणाºया महिला कर्मचाऱ्याने बस एक तास विलंबाने येणार असल्याचे प्रवाशांना सांगितले. त्यासाठी ही बस ठाण्यातून २.३० वाजता निघाल्याचे कारण देण्यात आले. तर वाहतुक कोंडीमुळे बस विलंबाने येणार असल्याची उदघोषणा करण्यात आली. यावेळी ठाण्याकडे जाणारी हिरकणी किंवा शिवशाही बसही नव्हती. त्यामुळे अर्धा तासाहून अधिक वेळ रांगेत उभे राहिलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर काही प्रवासी दादरला निघाले, तर काही प्रवासी बसची वाट पाहत तिथेच थांबले.
--------------
वेळापत्रकाला खो ; प्रवासी त्रस्त
शुक्रवारी ठाण्याला जाणाऱ्या विलंबाने धावत असल्या तरी दादरच्या बस मात्र वेळेत होत्या. शिवनेरी तासभर उशिरा असताना त्यावेळी दादरसाठी दोन अश्वमेध बस उभ्या होत्या. दीड तासात चार अश्वमेध बस दादरकडे रवाना झाल्या. एकीकडे ठाण्याहून येणाऱ्या बस वाहतुक कोंडीमुळे विलंबाने धावत असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे मात्र दादरहून येणाऱ्या बसेस वेळेत होत्या. दोन्ही बस द्रुतगर्ती मार्गानेच जातात.ठाण्यासाठी जुन्या शिवनेरी
एसटीच्या पुणे विभागाकडून काही शिवनेरी बसचे आयुर्मान आठ वर्षांहून अधिक झाले आहे. या बसला मुंबईत जाण्यासाठी बंधने आहेत. त्यामुळे सर्व जुन्या बस ठाण्याला सोडण्यात येत आहेत. तर आठ वर्षांहून कमी आयुर्मान असलेल्या बस दादरला सोडल्या जातात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.