रुग्णांना आता नो टेन्शन! पुणे महापालिकेची नवी योजना; 'या' आजारांवरची औषधे मिळणार मोफत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:59 PM2023-04-26T12:59:32+5:302023-04-26T13:02:43+5:30
वैद्यकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्डची गरज लागते मात्र कार्डशिवाय ही औषधी मोफत मिळणार
पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे शहरात उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे महापालिकेला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांर्तगत ४३ लाखांचा निधी मिळाला आहे. पालिकेच्या सर्व दवाखान्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची मोफत जेनेरिक औषधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने निविदा काढली असून, त्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
बदलती जीवनशैली ताणतणाव यातून ३० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ३० पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकसंख्येच्या २५ टक्के नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब, तर १२ टक्के लोकांमध्ये मधुमेह आढळला आहे. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून असंसर्गिक आजाराच्या उपचारासाठी प्राथमिक स्तरावर जेनेरिक औषधी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुणे महापालिकेला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांर्तगत ४३ लाखांचा निधी मिळाला आहे. या निधीमध्ये पुणे महापालिका स्वत:चा निधी टाकणार आहे. त्यातून उच्च रक्तदाबाची तीन आणि मधुमेहाची तीन औषधी नागरिकांना मोफत दिली जाणार आहेत.
कोणत्याही कार्डशिवाय ही औषधी मोफत मिळणार
पुणे महापालिकेच्या विविध वैद्यकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्डची गरज लागते. मात्र, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची जेनेरिक औषधी पालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये मोफत मिळणार आहे. मात्र, त्यासाठी कार्डची गरज लागणार नाही. ही औषधी मिळविण्यासाठी उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रक्त तपासणीचा अहवाल लागणार आहे, असे पुणे महापालिकेेचे साहाय्य आरोग्य प्रमुख डॉ. सजीव वावरे यांनी सांगितले.
दीड लाख लोकांना औषधी मिळणार
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ३० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकसंख्येच्या २५ टक्के नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब, तर १२ टक्के लोकांमध्ये मधुमेह आढळला आहे. या आकडेवारीनुसार पुणे शहरातील दीड लाख लोकांना ही औषधी मिळणार आहेत.