ध्वजवंदनच नाही; सरपंच, ग्रामसेवकावर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:24 AM2018-08-24T03:24:05+5:302018-08-24T03:24:30+5:30
मेटपिलावरे ग्रामपंचायतीतील प्रकार; तहसीलदांराना दिले निवेदन
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील मेटपिलावरे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनी ध्वजवंदन झालेच नाही. त्यामुळे येथील सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. य वैमनस्यातून खोटी तक्रार केल्याचा आरोप सरपंच राजू ढेबे यांनी केला आहे.
मेटपिलावरे ही ग्रुप ग्रामपंचायत असून तीमध्ये मेटपिलावरे, चºहाटवाडी, खोपडेवाडी ही गावे असून देवपाल, कोंढळकरवस्ती व सणसवाडीवस्ती अशा वाड्या आहेत. स्वातंत्र्य दिनी मेटपिलावरे ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजवंदन झाले नाही.
याबाबतची तक्रार येथील हनुमंत नाना पिलावरे, गणेश पिलावरे, अजय पिलावरे, बंडू बर्गे, माजी सरपंच ललिता पिलावरे आदी नागरिकांनी केली आहे. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की दर वर्षी ध्वजवंदन केले जाते. या वर्षी १४ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत आम्ही ग्रामसेवकाकडे ध्वज व दोरीची मागणी केली.
ग्रामपंचायत कार्यालयाची स्वच्छता करून ध्वजवंदन करायचे असल्याचे आम्ही सांगितले. त्यावर सरपंच व ग्रामसेवकांनी ‘आम्ही सकाळी ८ वाजता ध्वज व दोरी घेऊन येतो. आपण ध्वजवंदन करू,’ असे सांगितले. त्यानुसार सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजवंदन करण्यासाठी जमलो. सकाळी १० वाजले तरी सरपंच व ग्रामसेवक आलेच नाही. त्यामुळे ध्वजवंदन झालेच नाही. आमच्याकडे ध्वज व दोरी नसल्याने आम्हीही ध्वजवंदन करू शकलो नाही. हा स्वातंत्र्य दिनाचा अपमान असून त्याबाबत सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.
राजकीय वैमनस्यातून केले आरोप : सरपंच ढेबे
मेटपिलावरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजू कोंडिबा ढेबे यांनी, हनुमंत नाना पिलावरे हे सरपंच व ग्रामसेवक यांची नाहक बदनामी करीत आहेत. राजकीय वैमनस्यापोटी त्यांनी खोटी तक्रार केली आहे, असे निवेदन तहसीलदार प्रदीप उबाळे गटविकास अधिकारी मनोज जाधव यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की मेटपिलावरे ग्रामपंचायतीचे कार्यालय हे मोडकळीस आले असून त्या ठिकाणी ध्वजस्तंभदेखील नाही. या परिसरात पाऊस व वारा खूप मोठ्या प्रमाणात आहे. बांबूवर व काठीवर ध्वज फडकावणे योग्य होणार नाही.
भारतीय तिरंग्याचा तो अपमान होऊ शकतो, याकरिता मेटपिलावरे येथील ध्वजवंदन प्राथमिक शाळेत करण्यात आले. ग्रामपंचायत मेटपिलावरे सरपंच या नात्याने देवपाल या वाडीवर मी स्वत: ध्वजवंदन केले आहे.
ग्रामसेवक एस. एस. माने यांच्याकडे २ ग्रामपंचायतींचा पदभार असून त्यांनी पाल बुद्रुक येथे ध्वजवंदन केले. आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्या शांता हनुमंत पिलावरे यांचे पती हनुमंत नाना पिलावरे हे १४ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंचपदावरून वाद घालत होते.
ते माझा राजीनामा मागत होते. मी राजीनाम्यास नकार दिल्याने राजकीय वैमनस्यातून माझी नाहक बदनामी केली आहे. तर, आमच्या कार्यालयास इमारतीसाठी निधी मंजूर झाला असून हे काम ई-टेंडरिंगसाठी प्रोसेसिंगमध्ये आहे. कार्यालयाची इमारत पूर्ण झाल्यावर ध्वजवंदन करण्यात येईल.
मेटपिलावरे ग्रामपंचायतीचे कार्यालय मोडकळीस आल्याने ते बंद असते. येथील शाळेतच दर वर्षी ध्वजवंदन केले जाते. मात्र, या वर्षी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ध्वजवंदन करायचे ठरले होते का? याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल.
-मनोज जाधव, गटविकास अधिकारी पंचायत समिती, वेल्हे
माझ्याकडे पाल बुद्रुक व मेटपिलावरे या दोन ग्रुप ग्रामपंचायती असून मी पाल बुद्रुक येथे उपस्थित राहून ध्वजवंदन केले. सरपंच राजू ढेबे यांनी देवपाल येथील प्राथमिक शाळेत जाऊन ध्वजवंदन केले. मेटपिलावरे ग्रामपंचायतीचे कार्यालय मोडकळीस आल्याने ते
वापरात नाही; त्यामुळे तेथे ध्वजवंदन केले नाही.
-एस. एस. माने,
ग्रामसेवक