तुटपुंज्या रकमेवर समाधान मानणार नाही ; पैसे घेण्यास डीएसकेच्या ठेवीदारांचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 09:32 PM2019-05-02T21:32:03+5:302019-05-02T21:33:35+5:30
डीएसके यांनी न्यायालयात जमा केलेले 6 कोटी 65 लाख रुपये ठेवीदारांना परत देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा, असे यापूर्वी न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार त्या रकमेचे सुमारे 32 हजार ठेवीदारांना समान प्रमाणात वाटप करण्याबाबत प्रस्ताव आहे.
पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची न्यायालयात जमा असलेल्या रकमेचे वाटप केल्यानंतर ठेवीदारांच्या वाट्याला येणारी रक्कम तुटपुंजी आहे. 6 कोटी 65 लाख रुपये सुमारे 32 हजार ठेवीदारांना समान प्रमाणात वाटले तर प्रत्येकाला केवळ 2 हजार रुपये मिळतील. लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या ठेवीदारांना या रकमेचा काय फायदा होणार ? असा प्रश्न ठेवीदारांनी गुरुवारी न्यायालयात उपस्थित केला. त्यामुळे मिळणा-या त्या तुटपुंज्या रकमेवर समाधान मानणार नाही. व ती रक्कम स्वीकारणार नसल्याचा निर्धार ठेवीदारांनी केला आहे.
डीएसके यांनी न्यायालयात जमा केलेले 6 कोटी 65 लाख रुपये ठेवीदारांना परत देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा, असे यापूर्वी न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार त्या रकमेचे सुमारे 32 हजार ठेवीदारांना समान प्रमाणात वाटप करण्याबाबत प्रस्ताव आहे. मात्र तसेच संबंधित रक्कम घेण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 मे रोजी होणार आहे. या प्रकरणातील आरोपी डीएसके, हेमंती कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी आणि डीएसके डीएल कंपनी व इतर कंपन्यांचे नावे कोणताही बोजा नसलेल्या आणि तत्काळ विक्री योग्य अशा मालमत्तांची यादी तयार करण्यात येऊन ती न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
सदर मालमत्ता विक्रीमधून जमा होणारा पैसा हा न्यायालयाकडे जमा करून त्याचे ठेवीदारांना समप्रमाणात वितरण करण्यात यावे, असे सुचविण्यात आले आहे. डीएसके आणि कुटुंबीयांच्या बँक खात्यात असलेले सुमारे 12 कोटी रुपये पोलिसांनी गोठविले आहेत. ती रक्कम देखील यापुढील काळात ठेवीदारांना देण्याचा प्रस्ताव आहे, मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेले नाही.