पुणे : सामाजिक संघटनांच्या रेट्यामुळे ‘नोटा’चा (वरीलपैकी कोणीही नाही) पर्याय आणून मतदारांना पर्याय दिला गेला असला, तरी ही सकारात्मकता वंचितांसाठी मात्र नकारात्मक ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. पुणे महापालिकेत तब्बल १ लाख ७२ हजार ६३२ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. मात्र, मागास आणि महिला गटातील उमेदवारांच्या गटात नोटाचा वापर जास्त झाल्याचे दिसून आले आहे. लोकशाही पद्धतीच्या निवडणूक प्रक्रियेत गुंड-पुंड दूर ठेवण्याबरोबरच मतदारांना नकाराधिकाराचा पर्याय नोटाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. त्याचा वापर यंदाच्या निवडणुकीत वाढला आहे. पुणे महापालिकेत तब्बल १ लाख ७२ हजार ६३२ ठिकाणी नोटाचा वापर झाला आहे. एकूण मतांच्या टक्केवारीत हे प्रमाणात ३ टक्क्यांच्या वर आहे. नोटाबाबत जागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीमही राबविण्यात आली होती. निवडणुकीच्या वेळीही मतदारांना प्रभागानुसार चारही गटांमध्ये मते देणे बंधनकारक होते. एखाद्याने मतदान केले नाही तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून नोटाचा पर्याय असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्ष मतदानाच्या आकडेवारीत मात्र गुंडांना नाकारण्याऐवजी वंचित घटकांसाठी याचा वापर करण्यात आला. याचे प्रमुख कारण म्हणजे यंदाच्या प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीत बहुतांश पक्षांनी आरक्षित आणि महिला जागांवरील उमेदवारांबाबत फार विचार केला नाही. पॅनलप्रमुखाच्य नावाने प्रचार करण्यात आला. प्रभाग ७ अ मध्ये खुल्या गटासाठी १३५७ तर आरक्षित जागेसाठी ३०५३ असे नोटाचे प्रमाण होते. प्रभाग क्रमांक १४मधील अ गट अनुसूचित जातीसाठी राखीव होता़ तेथे २ हजार ७७८ नोटाचा वापर झाला़ ब गट मागासवर्ग स्त्री राखीव होता़ तेथे २ हजार १७७ जणांनी नोटाचा वापर केला़ क गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होता़ तेथे १ हजार ८५६ जणांनी नोटा वापरला, त्याच वेळी ड गट हा खुला होता़ त्यात फक्त ७८४ जणांनी नोटाचा वापर केला़ ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात अनेक ठिकाणी नागरिकांना पक्षाचे सर्व चार उमेदवार सांगता येत नव्हते. त्यामुळे उमेदवारांबाबत माहिती नसल्याने त्याठिकाणी नोटाचा वापर केला गेला. एकाच प्रभागात असणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती स्त्री राखीव तसेच महिला सर्वसाधारण या जागांवरील उमेदवारांना मते देण्यापेक्षा नोटाचा वापर अधिक होताना दिसून आला आहे़ त्यांच्या तुलनेत खुल्या जागेवर नोटाचे प्रमाण कमी आहे़ अनेक प्रभागांत अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती स्त्री राखीव या जागांवर ३ हजारांहून अधिक मतदारांनी नोटाचा वापर केल्याचे दिसून येत आहे़ प्रभाग १ अ गटामध्ये खुल्या वर्गासाठी केवळ ७६० जणांनी नोटा वापरला; मात्र अनुसूचित जमातीसाठी मात्र तब्बल ३०५६ मते नोटा होती.