आंबेठाण : शासकीय कर भरण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी मिळाल्याने अनेक ग्रामपंचायतींनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन करसंकलन सुरू केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात करवसुली होत असल्याने गावकारभाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारात वापरण्यासाठी शासनाने बंदी आणल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांत सुरुवातीला मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आता जवळ असणाऱ्या या पैशाचे काय करायचे? असेही विचारचक्र अनेकांच्या डोक्यात घोळू लागले होते. परंतु जवळ असणारा हा पैसा शासकीय कर भरण्यासाठी आणि अन्य काही ठराविक ठिकाणी वापरता येईल असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आल्याने अनेकांनी आजपर्यंत असणारी थकीत शासकीय देणी देण्यास सुरुवात केली.ग्रामीण भागात तर अनेकांकडे दोन ते तीन वर्षांपासून घरपट्टी, पाणीपट्टी तसेच अन्य शासकीय येणी बाकी होती. जवळचा कालांतराने बंद होणारा पैसा वापरला जावा म्हणून अनेकांनी आपली शासकीय देणी भरून टाकली आहेत. ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन कर भरण्याचे नागरिकांना आवाहन केले. त्यानुसार अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासकीय कर भरला जात असून, आजवर वारंवार विनंती करूनही कर न भरणारे स्वत: ग्रामपंचायतीच्या कार्यालयात येऊन कर भरताना दिसत होते. वराळे येथेदेखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन करसंकलन केले आहे. (वार्ताहर)
नोटाबंदीने कही खुशी, कही गम
By admin | Published: November 15, 2016 3:36 AM