पुणे : कन्हैया कुमारच्या पुण्यामध्ये रविवारी होणाऱ्या सभेसाठी तब्बल ४०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून, कायदा सुव्यवस्था बिघडू नये; तसेच सभास्थानी गोंधळ होऊ नये, याकरिता विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याच्या सभेला १४ संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून, विरोध करणाऱ्या संघटनांची संख्या ५ आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास लोहगाव विमानतळावर कन्हैयाचे आगमन होताच, त्याला कलम १४४नुसार सह पोलीस आयुक्तांची नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी दिली.पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीने कन्हैया कुमारची सभा आयोजित केलेली आहे. या सभेच्या आयोजनामध्ये १६ संघटनांचा समावेश आहे. यासोबतच अनेक राजकीय पक्षांनीही कन्हैयाच्या सभेला पाठिंबा दर्शविला आहे. सुरुवातीला पर्वती पायथा येथील सानेगुरुजी स्मारक सभास्थान ठरविण्यात आले होते; मात्र पोलिसांकडून आयोजकांना हे ठिकाण बदलण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या; तसेच काही अटीही घालण्यात आल्या होत्या. कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन ठिकाण बदलून बालगंधर्व रंगमंदिरात सभा घेण्याचे निश्चित केले. महापौर प्रशांत जगताप यांनी रविवारचा एक सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून सभागृह उपलब्ध करून दिले. डेक्कन पोलिसांनीही या सभेला परवानगी दिलेली आहे. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये येणाऱ्यांना ओळख तपासूनच आतमध्ये सोडले जाणार आहे. सभागृहाच्या व्यासपीठावर २० मान्यवर बसणार आहेत. त्यांची यादी पोलिसांनी मागवली आहे. कन्हैयाची सभा बालगंधर्व रंगमंदिरात असली, तरी तो एफटीआय आणि फर्ग्युसन कॉलेजला भेट देणार नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट केले आहे. सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांचे सुरक्षाकवच तयार करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या आत मंचाजवळदेखील कार्यकर्ते सुरक्षा देणार असून, रंगमंदिरात येण्याच्या सर्व प्रवेशद्वारावर देखील कार्यकर्त्यांचा खडा पहारा असणार आहे. (प्रतिनिधी)कन्हैयाचे विमानाने सकाळी अकराच्या सुमारास विमानतळावर आगमन होणार आहे. त्याला सह पोलीस आयुक्तांमार्फत कलम १४४ नुसार नोटीस बजावली जाणार आहे. देशविघातक, धार्मिक आणि प्रक्षोभक वक्तव्य करू नये, याकरिता ही नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही नोटीस बजावण्याचा न्यायिक अधिकार केवळ सह पोलीस आयुक्त किंवा सहायक पोलीस आयुक्तांना आहे.कन्हैयाच्या सभेसाठी बालगंधर्व रंगमंदिर आणि आसपासच्या भागात १ उपायुक्त, २ सहायक आयुक्त, ८ पोलीस निरीक्षक, २२ उपनिरीक्षक / सहायक निरीक्षक, १२० पुरुष कर्मचारी, १० महिला कर्मचारी, शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या आणि वज्र तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच विमानतळापासून बालगंधर्व रंगमंदिर या येण्या-जाण्याच्या मार्गवर चौका-चौकांत एकूण १२० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.कन्हैया कुमारला पुण्यात आल्यानंतर, पोलिसांकडून कलम १४४ अंतर्गत नोटीस बजावणे योग्य नाही. ही नोटीस केवळ अपवादात्मक परिस्थितीत बजावण्याचा अधिकार पोलिसांना आहे. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा मूलभूत हक्क आहे. त्यावर बंधन लादणे योग्य नाही. ही नोटीस बजावण्याबाबत काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही ५ मार्गदर्शक तत्त्वे दिली आहे. त्यानुसार नैसर्गिक न्यायतत्त्वाप्रमाणे आधी नोटीस बजावण्याआधी संंबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. त्यानंतर योग्य कारण असल्यास नोटीसद्वारे बोलण्याची बंदी घालायला हवी. कन्हैया कुमारच्या सभेवेळी जर काही घटकांकडून गोंधळ होण्याची भीती पोलिसांना असेल, तर त्यांच्यावर आधी कारवाई होणे अपेक्षित आहे. - अॅड. असीम सरोदे, मानवाधिकार कार्यकर्ते
विमानतळावर उतरताच कन्हैयाला बजावणार नोटीस
By admin | Published: April 24, 2016 4:29 AM