एरोस्पेस डिफेन्स हबसाठी पुण्यात पोषक वातावरण, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 02:23 AM2018-04-07T02:23:55+5:302018-04-07T02:23:55+5:30
संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने सरकारतर्फे आज जी काही पावले उचलली जात आहेत, त्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान असेल. लोहगाव विमानतळाचे सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच दृष्टीने नव्याने होत असलेल्या पुरंदर विमानतळाकडे पाहणे गरजेचे आहे. पुण्याचा विस्तार वेगाने होत आहे.
संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने सरकारतर्फे आज जी काही पावले उचलली जात आहेत, त्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान असेल. लोहगाव विमानतळाचे सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच दृष्टीने नव्याने होत असलेल्या पुरंदर विमानतळाकडे पाहणे गरजेचे आहे. पुण्याचा विस्तार वेगाने होत आहे. औद्योगिक हब झालेल्या पुण्यात देशांतर्गत विमानांची देखभाल-दुरुस्ती तसेच विकासाकरिता स्वतंत्र एरोस्पेस आणि डिफेन्स हबची (एम.आर.ओ.) निर्मिती होणे गरजेचे आहे. सध्या कोइमतूर येथे या प्रकराच्या हबची निर्मिती होत आहे. पुण्यात अशा हबची निर्मिती झाल्यास लष्करी आणि नागरी उड्डाण क्षेत्राला व सरंक्षणक्षेत्रालाही त्यांचा फायदा होईल.
लहानपणापासून मी पुण्याला बदलताना पाहिले आहे. हवाईदलात भरती झाल्यावर सुरुवातीला १९६८मध्ये लोहगाव विमानतळावरून वॅमपायर, तर निवृत्त होण्याआधी सुखोई विमाने चालवली आहेत. त्या वेळचे आकाशातून दिसणारे पुण्याचे दृश्य आणि आणि आत्ताचे दृश्य यांत मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. पुण्यात सरंक्षणक्षेत्रातील संस्थांबरोबरच मानवी वस्ती आणि उद्योगांचाही झपाट्याने विस्तार झाला आहे. पुण्यासाठी स्वतंत्र विमानतळ गरजेचा आहे. या विमानतळाकडे केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून न पाहता, सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. कारण, लोहगाव विमानतळ सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. हा फ्रंटलाईन विमानतळ असून तेथून उड्डाण करून हवेतूनच इंधन भरून काही वेळातच शत्रूवर हल्ला करता येऊ शकतो. याचबरोबर, पश्चिमेकडील भारताच्या समुद्रहद्दीतील साधनसपंत्ती आणि किनाऱ्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा विमानतळ महत्त्वाचा आहे. सध्या केवळ गोवा, जामनगर आणि पुणे हे तीनच लष्करी विमानतळ या संपूर्ण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आहेत. त्यामुळे नव्या विमानतळांची गरज आहे. पुण्यात वाढलेले उद्योग तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने प्रवासी आणि उद्योजकांसाठी स्वतंत्र विमानतळाची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. यामुळे आता तरी पुरंदरचा विमानतळ लवकर व्हावा, अशी अपेक्षा करतो. पाकिस्तान आणि चीन यांच्या धोक्यामुळे पूर्वेकडे विमानतळ उभारले गेले. यामुळे दक्षिण भारतात लष्करीदृष्ट्या विमानतळ उभारले गेले नाहीत. सध्या चीन विविध देशांत त्यांचे तळ उभारत आहे; त्यामुळे आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. यामुळे या विमानतळांकडे व्यावसायिक दृष्टीने न बघता, सामरिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. शैक्षणिकदृष्ट्या पुणे आघाडीवर आहे. उद्योगांचा विकास झाल्याने अनेक तज्ज्ञमंडळी पुण्यात आहेत. शिवाय, अनेक लष्करी तळ आणि डीआरडीओसारख्या प्रयोगशाळा पुण्यातच असल्याने एरोस्पेस आणि डिफेन्स हबसाठी लागणारे मनुष्यबळ व आवश्यक सुविधाही मिळू शकतात. या प्रकारचा हब पुण्यात झाला, तर त्याचा मोठा फायदा होईल. तसेच, नागरी क्षेत्रातील विमाननिर्मितीमध्येही आपण स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पुढे जाऊ.
पुरंदरला होणारा विमानतळ हा केवळ पुण्यापुरता मर्यादित नसेल. डिफेन्स प्रॉडक्शन, मालाची ने-आण तसेच कृषी उत्पादनांच्या दृष्टीने हा विमानतळ फायद्याचा आहे. आज पुण्याची ओळख ही केवळ शिक्षण आणि सांस्कृतिक एवढीच राहिलेली नाही. औद्योगिक हब असलेल्या पुण्यात या प्रकारच्या विमानतळामुळे दळणवळण वेगवान होईल आणि खºया अर्थाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन पुण्याच्या मानांकनात वाढ होईल.
शब्दांकन : निनाद देशमुख