.....यापुढे परराज्यातील विद्यार्थ्यांवर मनसे नजर ठेवेल : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 03:07 PM2018-07-18T15:07:36+5:302018-07-18T15:11:45+5:30
मराठी मुलांना डावलून परराज्यातील मुलांना प्रवेश दिला तर मनसे त्यांच्यावर नजर ठेवेल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे..
पुणे : राज्यातील मराठी मुलांना वैद्यकीय शाखेसाठी प्रवेशाला प्राधान्य मिळाले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राने कायदा करावा. मराठी मुलांना डावलून परराज्यातील मुलांना प्रवेश दिला तर मनसे त्यांच्यावर नजर ठेवेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. ही धमकी समजायची असेल तर तसे समजा असे ते म्हणाले.
तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांनी नीट परीक्षेसाठी त्यांच्या मुलांना प्राधान्य मिळावे यासाठी कायदा केला. राज्यात तसा कायदा नाही. कोणीतरी न्यायालयात गेले तर न्यायालयाने मराठी मुलांच्या प्रवेशालाही स्थगिती दिली. मागील वर्षीही हेच झाले होते. याही वर्षी तेच होत आहे. राज्य सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. केंद्र सरकारच्या आदेशावर राज्य चालले आहे असा आरोप ठाकरे यांनी केला.
इयत्ता १० वी व १२ वी राज्यातील शाळांमधून झाला असेल तरीही रहिवाशी असल्याचा दाखला मराठी मुलांना मागितला जातो. केंद्राला त्यांच्या राज्यातील विशेषत: गुजरातमधील मुले राज्यात घुसवायची आहेत. दरवर्षी मराठी मुलांवर हा अन्याय होत आहे. तामिळनाडू मध्ये तेथील मुलांना त्यांच्या भाषेत नीटची परिक्षा देता आली. त्यात चार प्रश्न चुकीचे होते. त्याविरोधात तेथील खासदार न्यायालयात गेले. न्यायालयाने प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नांचे चार गूण देण्याचा आदेश दिला. आपले खासदार, आमदार काय करतात असा सवाल ठाकरे यांनी केला.
राज्य सरकार त्यांचे काम नीट करत नाही. त्यांना केंद्राकडून आदेश येतात व ते त्याचे पालन करतात असे सगळे सुरू आहे. मराठी मुलांना फक्त नीट मध्येच नाही तर उद्योग व्यवसायातही डावलले जात आहे. वैद्यकीय परिक्षा सरकारने गंभीरपणे घेतली पाहिजे, अन्य राज्यांनी त्यांच्या मुलांना प्राधान्य मिळावे यासाठी कायदा केला. राज्य सरकार मात्र काहीही करत नाही. त्यांच्या या धोरणामुळे परराज्यातील मुलांना महाराष्ट्रात प्रवेश मिळतात. आमचे त्यांचे काही वाकडे नाही, मात्र मराठी मुलांना प्राधान्य मिळाले पाहिजे. त्यातून जागा शिल्लक राहिल्या तर त्यांना द्या.
राज्यातील शिक्षणसंस्थाचालक परराज्यातील मुलांना प्रवेश देतात याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी शिक्षणसंस्था चालकांनीही याकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते, पुन्हा करू, त्यावेळी तुम्हा आमच्याकडे लक्ष द्या असे आवाहन ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना केले. संस्थाचालक लक्ष देत नाहीत, राज्य सरकार लक्ष देत नाही, मग परराज्यातील मुले महाराष्ट्रात आली तर आम्ही मात्र त्यांच्याकडे नीट लक्ष देऊ असा इशारा ठाकरे यांनी दिला.
....................
दुधाचे आंदोलन होणार हे माहिती असताना राज्य सरकारने बैठक का घेतली नाही. इथे दूध संकलन होते, त्यांना भाव दिला तर सरकारचे काय जाते. भाव देण्यासारखी सरकारी आर्थिक स्थिती नक्कीच आहे. इथली सर्व व्यवस्था मोडायची व गुजरातमधील सगळे काही इथे आणायचे यांचे धंदे सुरू आहेत असा आरोप ठाकरे यांनी केला.