भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. विरोधाची धार अधिक तीव्र करण्यासाठी रोमणवाडी ग्रामस्थांनी विमानतळ विरोधी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. एकाच दिवसात तब्बल ४४१ ग्रामस्थ व युवकांनी स्वाक्षऱ्या करत विमानतळाला विरोध दर्शविला.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुरंदरमधील पांडेश्वर, रोमनवाडी, राजुरी, रिसे, पिसे, नायगाव व बारामतीमधील चांदगुडेवाडी, भोंडवेवाडी व आंबी खुर्द येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस विमानतळाला शेतकऱ्यांचा असलेला विरोध अधिक तीव्र होत चाललेला आहे. नायगाव (ता. पुरंदर) येथील वाड्यावस्त्यांवर बैठका घेऊन ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहेत. रात्री उशिरा बैठका घेतल्या जातात. तरी देखील मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ बैठकांना उपस्थित राहून विचारविनिमय करताना दिसतात. रोमणवाडी (ता. पुरंदर) येथे (दि.१३) रोजी विमानतळाला विरोध दर्शविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली गेली. यामध्ये एकूण ४४१ ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. शेतकरी, ग्रामस्थ, युवकांबरोबर महिलांनीदेखील सहभाग नोंदवून विमानतळास तीव्र विरोध दर्शवला आहे.
विमानतळ बाधित क्षेत्रातील शेतकरी प्रदीप रोमन म्हणाले की, आम्हाला विमानतळ नको. आम्हाला आमची शेतीच करू द्या. शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करणार आहे. हा विरोध शासनाला पटवून देण्यासाठी प्रत्येक गावात स्वाक्षऱ्या मोहीम राबवत आहोत.
रोमणवाडी (ता. पुरंदर) येथे विमानतळ विरोधी स्वाक्षरी मोहिमेला उपस्थित असलेले ग्रामस्थ.