आता हजार शाळांत भरणार ‘स्वप्नशाळा’
By admin | Published: September 7, 2015 04:23 AM2015-09-07T04:23:41+5:302015-09-07T04:23:41+5:30
‘परीक्षेचे टेन्शन नाही... घोकंपट्टी नाही... पुस्तकांचे ओझे नाही...
बापू बैलकर, पुणे
‘परीक्षेचे टेन्शन नाही... घोकंपट्टी नाही... पुस्तकांचे ओझे नाही... होय, ही विद्यार्थ्यांच्या मनातील ‘स्वप्नशाळा’ (कृतियुक्त अध्ययन पद्धती) आता जिल्हा परिषदेच्या १ हजार शाळांमध्ये प्रत्यक्षात उतरणार आहे. मुलं हसत-खेळत शिकतानाचे चित्र पाहावयास मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २ हजार कोटींची तरतूद केली आहे. त्याची अंमलबजावणी येत्या वर्षात करण्यात येणार आहे.
‘एबीएल’ (कृतीयुक्त अध्यक्षयन) ही एक सर्वसमावेशक, पूर्णपणे कृतीवर भर देणारी पद्धती असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास व्हायला वाव मिळतो, ज्ञानात भर पडते व सर्वांगीण विकासाला चालना मिळते. यामुळे शालाबाह्य मुलांना शाळेत येण्यासाठी मदत होऊ शकते. विद्यार्थ्याला अभ्यासाचा कंटाळा येत नाही, परीक्षेची भीती आपोआप नाहीशी होते.
स्वत:च्या कुवतीनुसार प्रत्येक विद्यार्थी शिकतो. सामूहिक परीक्षा नाही. प्रत्येक विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन.
पुस्तकांचे ओझे नाही. विद्यार्थी व शिक्षक दोघांच्या कृतिशीलतेला वाव. शिक्षकाची भूमिका विद्यार्थी घेत असल्याने शिक्षकांवरील ताण कमी होण्यास मदत.
कोणीतीही क्षमता अप्राप्त राहत नाही. परीक्षेची भीती नाही, घोकंपट्टीला वाव नाही. कोणताही विद्यार्थी अमूकपेक्षा हुशार नाही किंवा अमूकपेक्षा मठ्ठ नाही, असे दर्शविता येत नाही.
‘मी ऐकतो, मी विसरतो, मी पाहतो, मी लक्षात ठेवतो, मी स्वत: कृती करतो, मी पूर्ण ज्ञान मिळवतो’ यावर आधारित विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता कृतीवर आधारित व्यावहारिक शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाने ‘कृतियुक्त अध्ययन’ हा विशेष कार्यक्रम सुरू केला होता. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २०१०-११ पासून ही कृतियुक्त अध्ययन पद्धती राबविण्यास सुरुवात झाली. भोर तालुक्यातील ३० शाळांत प्रायोगिक तत्त्वावर तो राबविण्यात आला होता. पहिल्या वर्र्षापासूनच या उपक्रमाला यश येत आहे, असे पाहून ते इतर तालुक्यांतही राबविण्यास सुरुवात केली. नुकतीच जिल्ह्यात येऊन गेलेल्या पंचायत राज समितीनेही या उपक्रमाचे कौतुक केले असून, हा उपक्रम राज्यातही सुरू करण्याच्या सूचना करू, असे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आता मोठ्या प्रमाणात तो राबविण्याचे ठरविले असून, या वर्षात १ हजार शाळांमध्ये ही कृतियुक्त अध्ययन पद्धती राबविण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. ४) झालेल्या सर्वसाधारण सभेत यासाठीच्या वाढीव निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंकल्पात १ कोटी ३० लाखांचा निधी यासाठी देण्यात आला होता. आता यात आणखी ७० लाखांना मंजुरी मिळाली असून, आता यासाठी २ कोटी इतका निधी मिळणार आहे.
यात शिक्षक हा फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत असेल. विद्यार्थी एकमेकांच्या मदतीने शिकणार आहेत. विशेष म्हणजे, यात परीक्षा (मूल्यमापन) घेतल्याचे मुलांना समजतच नाही. म्हणजे परीक्षेचे टेन्शन त्यांना येत नाही. नकळतपणे त्याचे मूल्यमानप होत असते. म्हणजे नापास होण्याचे टेन्शनही त्याला नसते.