पुणेः क्रिकेटप्रेमींच्या आकर्षणाचं ठिकाण असणाऱ्या पुण्यातील 'ब्लेड्स ऑफ ग्लाेरी' क्रिकेट संग्रहालयाच्या वैभवात आता आणखी भर पडली आहे. या संग्रहालयाला गूगलच्या आर्ट्स अँड कल्चर या खास ऑनलाईन प्लॅटफाॅर्मवर स्थान मिळाले आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांना घरबसल्या थ्रीडी इफेक्टमध्ये हे संग्रहालय पाहता येणार आहे.
पुण्यातील सहकारनगर भागातील स्वानंद साेसायटी येथे चार हजार चाैरस फुटांच्या भव्य जागेत स्वतः उत्तम क्रिकेटपटू असलेले क्रिकेटप्रेमी रोहन पाटे यांनी २०१२ मध्ये 'ब्लेड्स ऑफ ग्लाेरी' हे क्रिकेट संग्रहालय सुरु केले. जागतिक क्रिकेटमधील संस्मरणीय सामने आणि मैदान गाजवलेल्या क्रिकेटपटूंनी वापरलेल्या वस्तूंचा दुर्मिळ खजिना या संग्रहालयात आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आले होते. आता या संग्रहालायला गुगलच्या 'आर्टस अँड कल्चर’ या विशेष ऑनलाईन प्लॅटफाॅर्मवर स्थान मिळाले आहे. त्यामुळे जगभरातल्या क्रिकेटप्रेमींना घरबसल्या थ्री-डी स्वरुपात हे संग्रहालय पाहता येणार आहे. गुगलच्या https://goo.gle/2KrC9sC या लिंकवर हे संग्रहालय पाहता येणार आहे.
याबाबत बाेलताना रोहन पाटे म्हणाले, ‘‘या संग्रहालयाच्या गूगलच्या आर्टस् अँड कल्चर प्लॅटफॉर्मवर समावेश झाल्यामुळे पुण्याचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आले आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची बाब असून प्रत्येक जण आता घरबसल्या हा संग्रह पाहण्याचा आनंद घेऊ शकेल.’’
सचिन तेंडुलकरने वापरलेल्या वस्तूंचा एक खास विभागच या संग्रहालयात आहे. तसेच भारताच्या क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली याच्या नावाचाही खास कक्ष संग्रहालयात असून त्याचे उद्घाटन विराटच्याच हस्ते करण्यात आले होते. विव्हियन रिचर्ड्स, वसीम अक्रम, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेलपासून केदार जाधवपर्यंत विविध राष्ट्रीय व आंततराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी या संग्रहालयास भेट दिली आहे.