पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉनमुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. आज कॅनडा, मालदीव, दुबई, माली, युयेस वरून आलेल्या दहा आणि त्यांच्या संपर्कातील पाच अशा एकूण १५ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. तर ३३ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१ वर पोहोचली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. परदेशातून आलेल्यांमुळे पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भर पडत आहे. ओमायक्रॉनवर उपचार करण्यासाठी भोसरी आणि पिंपरीत दोन रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. आजपर्यंत परदेशातून आलेल्या ५७ तर त्यांच्या संपर्कातील ३४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे पाठविले होते.
त्यापैकी परदेशातून आलेल्या ३१ जणांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला. तर, त्यांच्या संपर्कातील १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच रँडम तपासणीत १४ जणांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. त्यात उपचार घेऊन ३३ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी चार जण कॅनडावरून, एक मालदीववरून, एक दुबईवरून, एक मालीवरून, तर तीन जण युएसवरून आले आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना बाधा झाली आहे. त्यात सहा पुरूष आणि नऊ महिलांचा समावेश आहे. सर्वांवर भोसरीतील महापालिका आणि पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.