पुणे : कोरोनाबाधितांची नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असताना, सोमवारी शहरात कोरोना दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी म्हणजे केवळ ७० नवे रुग्ण आढळून आले आहेत.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार ६७५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये १.४९ टक्के रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात यापूर्वी सर्वांत कमी रुग्ण शनिवारी (दि.१६) ८४ रुग्ण तर ११ ऑक्टोबरला ८६ व तत्पूर्वी २० सप्टेंबरला ८६ रुग्ण आढळले होते. तसेच तब्बल आठ महिन्यांपूर्वी म्हणजे २५ जानेवारी रोजी कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीच्या आत आला होता. त्यावेळी प्रथमच एका दिवसात ९८ रुग्ण आढळून आले होते. मात्र, त्यानंतर सातत्याने शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा शंभरच्या पुढेच राहिला होता.
आतापर्यंत ४ लाख ९३ हजार १७७ जण कोरोनामुक्त
शहरातील सक्रिय रुग्ण लक्षणीयरित्या घटली असून, सोमवारी सायंकाळी ४ पर्यंत शहरात केवळ १ हजार ३ रुग्ण होते. तर काल दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहे. शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १६४ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २१६ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३४ लाख ८४ हजार ७१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ३ हजार २४५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९३ हजार १७७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.