महिलांचा केवळ सहभाग नकाे, नेतृत्व पुढे येण्याची गरज- ओम बिर्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 11:54 AM2022-09-29T11:54:55+5:302022-09-29T11:56:43+5:30
हुजूरपागा महाविद्यालयाचे नामकरण...
पुणे : जगाचे नेतृत्व करायची क्षमता भारतात आहे, त्यासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आता सर्व क्षेत्रात महिलांची केवळ भागीदारी नव्हेतर, नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांना शिक्षित करणाऱ्या संस्थांची जबाबदारी अधिक वाढली आहे, असे मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा वाणिज्य महाविद्यालयाचे नामकरण ‘दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय’ असे करण्यात आले. त्याच्या कोनशिलेचे अनावरण बिर्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू उपस्थित होते. यावेळी मंचावर संस्थेच्या अध्यक्षा रेखा पळशीकर, उपाध्यक्ष हिमानी गोखले, सचिव वरदेंद्र कट्टी, सहसचिव शालिनी पाटील, प्र. कोषाध्यक्ष डॉ. सुषमा केसकर, मुख्य विश्वस्त उषा वाघ, विश्वस्त अजित बायस, विश्वस्त दुष्यंत घाडगे आदी उपस्थित होते.
बिर्ला म्हणाले की, भारतात कुठलीही स्पर्धा असाे वा परीक्षा, तिथे महिलांची गुणवत्ता ही पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा गुणवंत महिलांना अधिक सक्षम बनविण्याबरोबरच त्यांना नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. पुण्यातील महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेचे महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्वाचे कार्य गेल्या १३८ वर्षांपासून सुरू आहे. असे काम सर्व संस्थांनी उभे करणे आवश्यक आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात १३८ वर्षांपूर्वी शाळा सुरू केली हाेती. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीने मुलींसाठी देशातील दुसरी माध्यमिक शाळा सुरू केली. यातून पुण्याचा मोठेपणा सिद्ध होतो, असे मत श्याम जाजू यांनी व्यक्त केले. रेखा पळशीकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉॅ. रूपाली शेठ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रियदर्शिनी पुरोहित यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य विश्वस्त उषा वाघ यांनी आभार मानले.
सरकार सर्वच क्षेत्रांत त्यांचे काम चोख करीत आहे, त्यामुळे येत्या काळात आपण जगाचे नेतृत्व करू शकतो. आता समाजानेही त्याचे कर्तव्य पार पाडले पाहिले. महिलांसाठी सक्षम शिक्षण व्यवस्था उभी करणे आणि त्या माध्यमातून उत्तम शिक्षण देणे हे कार्य समाजातील संस्थांनी केले पाहिजे.
- ओम बिर्ला, अध्यक्ष, लाेकसभा