Omicron Variant: ओमायक्रॉनने पुणेकरांचे टेन्शन वाढवले; शहरात शुक्रवारी नव्या ६ रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 08:44 PM2021-12-24T20:44:46+5:302021-12-24T20:46:00+5:30
शुक्रवारी पुण्यामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५ रुग्ण पुणे छावणी बोर्ड हद्दीतील, तर १ पुणे महापालिका हद्दीतील आहे.
पुणे : शुक्रवारी पुण्यामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५ रुग्ण पुणे छावणी बोर्ड हद्दीतील, तर १ पुणे महापालिका हद्दीतील आहे. शहरातील आतापर्यंतच्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ७ झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत १९, तर पुणे ग्रामीणमध्ये १५ रुग्ण आढळून आले आहेत. सर्व रुग्ण लक्षणेविरहित आहेत. नाताळ, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात २४ डिसेंबर रोजी २० ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १४ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर ६ रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था यांनी अहवाल दिले आहेत. राज्यातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १०८ इतकी झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासाहून आलेल्या प्रवाशांचे क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ७२२ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी १५७ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहेत.
ओमायक्रॉन व्हेरियंट जिल्ह्यात हात-पाय पसरत असल्याने आता जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. एकीकडे ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण, तर दुसरीकडे दैनंदिन कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही वाढत असल्याने नागरिकांनी शिस्त बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नाताळचा सण साधेपणाने साजरा करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. नाताळच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ५० टक्के उपस्थितीचा नियम जारी करण्यात आला आहे.