Omicron Variant: ओमायक्रॉनबाधितांचे विलगीकरण घरात नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 01:02 PM2021-12-07T13:02:50+5:302021-12-07T13:07:30+5:30
पुणे : पुणे जिल्हा आणि शहरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक वेगाने आणि काटेकोरपणे केले जाणार आहे. आतापर्यंत १ नोव्हेंबरपासून ‘अँट ...
पुणे:पुणे जिल्हा आणि शहरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक वेगाने आणि काटेकोरपणे केले जाणार आहे. आतापर्यंत १ नोव्हेंबरपासून ‘अँट रिस्क’ देशांमधून आलेल्या प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. त्यातील केवळ दोनजण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा आणि शहर पातळीवर कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले जाणार आहे.
युरोपमधील देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिंबाब्वे, सिंगापूर, हाँगकॉंग, इस्त्राईल अशा देशांमधून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवला जाणार आहे. परदेशात प्रवास करुन आलेल्या आणि विमानतळावर कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण व्यवस्था उभारण्याचे आदेश आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहेत. जिल्हा पातळीवर कोव्हिड केअर सेंटरसाठी पुरेसे मनुष्यबळ, ऑक्सिजन बेडची उपलब्धता, औषधे याबाबतच यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
ओमायक्रॉन रुग्णांसाठी उपाययोजना :
१) रुग्णांची लक्षणे लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांचे विलगीकरण केले जाईल.
२) रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तातडीने केले जाईल.
३) कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील.
४) ओमायक्रॉनबाधित रुग्णाची दहाव्या दिवशी पुन्हा चाचणी केली जाईल. ती निगेटिव्ह आल्यास त्याची पूर्ण तपासणी करुनच डिस्चार्ज दिला जाईल.