पुणे : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आता महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे. डोंबिवलीमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर आता प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. पुण्यातही ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला असून पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात एक रुग्ण आढळून आला आहे.
२४ नोव्हेंबरला नायजेरिया देशातून आलेले ४४ वर्षीय महिला आणि तिच्या सोबत आलेल्या २ मुली तसेच पिंपरी चिंचवड शहरात राहणार तिचा भाऊ आणि त्याच्या २ मुली असे एकूण सहा जणांचे नमुने ओमायक्रॉन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेने आज सायंकाळी त्यांचा अहवाल दिला आहे.
तर पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून तो १८ ते २५ नोव्हेंबर दरम्यानच्या काळात फिनलँड येथे गेला होता. २९ तारखेला थोडासा ताप आल्याने कोव्हीड चाचणी केली असता तो कोरोनाबाधित आढळून आला. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्याला कोणतीही लक्षणे नसून त्याची प्रकृती नाहीत असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ओमायक्रॉन आढळणाऱ्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे.
शहरात आतापर्यंत ३४ लाख नागरिकांचा पहिला डोस, तर २३ लाख नागरिकांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी दुसरा डोस घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.