बारामतीत ओल्या कचऱ्याची जागेवरच होणार विल्हेवाट; मिनी बायोगॅस प्रकल्पामुळे खर्चात बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 04:33 PM2023-07-29T16:33:13+5:302023-07-29T16:34:07+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिनी बायोगॅस प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून दैनंदिन निघणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यामधून बायोगॅस निर्मिती केली जाते...

On-site disposal of wet waste in Baramati; Cost savings due to mini biogas project | बारामतीत ओल्या कचऱ्याची जागेवरच होणार विल्हेवाट; मिनी बायोगॅस प्रकल्पामुळे खर्चात बचत

बारामतीत ओल्या कचऱ्याची जागेवरच होणार विल्हेवाट; मिनी बायोगॅस प्रकल्पामुळे खर्चात बचत

googlenewsNext

बारामती (पुणे) :बारामती नगरपरिषदेने ओल्या कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच लावण्याच्या दृष्टिकोनातून आता बारामती नगरपालिकेने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील मोठी हॉटेल्स व मोठ्या गृहनिर्माण संस्था यामध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नगरपालिकेने कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या खर्चात बचत होत आहे.

बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लागावी, शहरातील प्रदूषण कमी होण्यासाठी बायोगॅस निर्मिती प्रकल्प राबविला जात आहे. बँक ऑफ बडोदा व बारामती नगरपरिषद बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिनी बायोगॅस प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून दैनंदिन निघणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यामधून बायोगॅस निर्मिती केली जाते. पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बायोगॅस हा योग्य पर्याय आहे. स्वयंपाकघरातील तसेच हॉटेलमधील किचनमध्ये दररोज तयार होणाऱ्या या कचऱ्याचे करायचं काय, हा प्रश्न सगळ्यांसमोर असतो; पण हाच निर्माण झालेला ओला कचरा निर्मिती स्थळी योग्य प्रक्रिया करून बायोगॅसच्या रूपाने स्वयंपाकासाठी वापरता येतो. त्यामुळे खर्चात बचत होते.

शहरातील हॉटेल मधुबन, हॉटेल सुदित, कलावती अपार्टमेंट येथे बायोगॅस निर्मितीची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये बँक ऑफ बडोदाने सीएसआर फंडातून बायोगॅस निर्मितीसाठी आवश्यक यंत्रणा खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के आर्थिक सहाय्य केले आहे. उर्वरित पन्नास टक्के रक्कम संबंधित हॉटेल व्यावसायिक व सोसायटी यांनी दिले आहे.

हॉटेल, सोसायटीमध्ये दैनंदिन तयार होणारा ओला कचरा म्हणजेच शिळे अन्न व इतर ओला कचरा हा त्याच ठिकाणी त्या यंत्रणेमध्ये टाकण्यात येतो. तसेच त्याच्यापासून गॅस निर्मिती केली जाते. त्याचा पुरेपूर फायदा हॉटेल व्यावसायिक आणि सोसायटी यांना होत आहे. ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया झाल्याने या कचऱ्याची वाहतूक व कचरा शहरातील प्रक्रिया प्रकल्पापर्यंत नेण्याचा ताण कमी होणार आहे. तसेच निर्मितीस्थळी प्रक्रिया केल्याने कचरा साठून राहत नाही. याशिवाय प्रक्रिया केल्यामुळे संबंधित हॉटेल व सोसायटी यांना बायोगॅस मोफत प्राप्त होत आहे. दैनंदिन वापरासाठी लागणारा एलपीजी गॅस सिलिंडर हा कमी प्रमाणात लागतो. परिणामी, त्यांच्या पैशाची बचत होत आहे.

Web Title: On-site disposal of wet waste in Baramati; Cost savings due to mini biogas project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.