- पांडुरंग मरगजे
धनकवडी (पुणे) : तिचे नाव सीमा. मनाेरुग्ण अवस्थेत हरवली आणि बेवारसरीत्या ती खडकमाळ अळी पाेलिस स्टेशनच्या हद्दीत ती वर्षभरापूर्वी पाेलिसांना आढळली. येथील वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संगीता यादव यांनी तिला आसरा संस्थेच्या स्वाती डिंबळे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिले. पाेलिस प्रशासन आणि आसरा संस्थेच्या संचालिका स्वाती डिंबळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे मनोरुग्ण अवस्थेत हरवलेल्या तिच्या स्मृती जागा झाल्या आणि तिने चाैफुला केडगावचा उल्लेख केला आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती तिच्या घरी वर्षभरानंतर सुखरूप परतली. तेव्हा घरच्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
हेल्पिंग हॅन्ड सोशल फाउंडेशनच्या स्वाती डिंबळे यांनी त्या युवतीला आसरा दिला. तिच्यावर येरवडा येथे उपचार सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान ती हळूहळू बोलकी झाली. तिचे नाव कळले. परंतु तिला फारसे आठवत नव्हते. ‘चौफुला केडगाव’ एवढेच नाव ती घेत होती. एक दिवस स्वाती डिंबळे यांनी तिला सोबत घेऊन चौफुल्याला जाऊन तिचं घर शोधून काढण्याचे ठरवले. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला डिंबळे यांनी तिला सोबत घेऊन चौफुल्याला पाेहाेचल्या. दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर रात्री ‘सीमा’चे घर शोधण्यात डिंबळे यांना यश मिळाले. सीमाची आई समोर आल्याबरोबर सीमाला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सीमा आपल्या घरी आल्याबरोबर तिचे सर्व नातेवाईक आणि आसपासचे शेजारी जमा झाले लहान थोर सर्व मंडळींना सीमा ओळखत असल्याचे पाहून सगळ्यांना समाधान वाटले.
हरवलेल्या स्थितीपेक्षा सीमा खूपच चांगल्या स्थितीत असल्याचे दिसल्याने सगळ्यांनी डिंबळे यांचे आभार मानले आणि सीमाला तिचं स्वतःचं घर मिळालं होतं; परंतु तिला सोडून परताना स्वाती डिंबळे यांची पावलं मात्र जड झाली.
लेक परतण्याचा आनंद खूप माेठा
लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशीच अनपेक्षितरीत्या आमच्या घराची लक्ष्मी असलेली आमची कन्या वर्षभरानंतर घरी परतली. हे सर्व हेल्पिंग हॅंडच्या डिंबळे मॅडम आणि त्यांच्या संस्थेमुळे शक्य झाले असून, आमची मुलगी परत आल्यामुळे खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन आम्ही करू शकू, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार, अशा शब्दात याप्रसंगी ‘सीमा’च्या आईने आभार मानले.