Dog Injured: चिऊच्या डोळ्यात दीडशे अळ्या; उपचारानंतर तिच्या मनी फुलल्या आनंदाच्या कळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 07:19 PM2022-03-14T19:19:03+5:302022-03-14T19:19:44+5:30
चिऊ या दोन महिन्याच्या कुत्र्याच्या पिल्लाला डोळ्याला जखम झाली होती
श्रीकिशन काळे
पुणे : दोन महिन्यांची ‘चिऊ’ रस्त्यालगत होती आणि तिच्या डोळ्याला खूप जखम झालेली दिसली. हे कुत्र्याचं पिल्लू एका डाॅगप्रेमीने पाहिले आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरकडे घेऊन गेले. ‘चिऊ’च्या एका डोळ्यात दीडशे अळ्या निघाल्या. डोळा तर निकामी झाला; पण चिऊवर उपचार झाले. काही दिवसांनंतर तिला कोणी दत्तक घेईल का ? याविषयी हालचाली झाल्या; पण तिला एक डोळा नसल्याने कोणी दत्तक घेईल असं वाटत नव्हते; पण गगनबावडा येथील दाम्पत्याने चिऊला हक्काचे घर दिले. ती चिऊ आज त्यांच्या घरात, शेतात खूप आनंदाने बागडत आहे.
प्राणीप्रेमी ॲड. विंदा महाजन यांना ही चिऊ कोथरूडमधील परमहंस नगर परिसरात दोन महिन्यांची असताना दिसली. तिच्या डोळ्याला जखम झाल्याने तिला डॉक्टरकडे नेले. डॉ. तुळपुळे यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. तेव्हा तिच्या डोळ्यात सुमारे दीडशे अळ्या निघाल्या. त्या अळ्यांनी संपूर्ण डोळाच खाल्ला होता. त्यामुळे तो निकामीच झाला. परंतु, चिऊचा दुसरा डोळा चांगला होता. त्यामुळे तिच्यावर उपचार करण्यासाठी नाईक मंदिर ॲनिमल ग्रुपच्या सदस्यांनी प्रयत्न केले. हळूहळू चिऊचे आरोग्य सुधारू लागले आणि ती एकदम फिट झाली; पण तिला एक डोळा निकामी झालेला असताना कोणी दत्तक घेईल, असं वाटत नव्हते. परंतु, कोल्हापूर येथील गगनबावडा येथे राहणारे देवदत्त नाईक आणि सुजाता ठोसर यांनी चिऊला दत्तक घेण्याचा निर्णय सांगितला. पद्मिनी खांडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाईक कुटुंबीयांकडे नेलेे. त्यानंतर आता चिऊ तिथं खूप छान रमली आहे. घरात, शेतात बागडत आहे. तिला एक डोळा नसल्याने काहीच अडचण आलेली नाही, असे ॲड. विंदा महाजन यांनी सांगितले. ॲनिमल ग्रुपच्या पद्मिनी खांडेकर, प्रीती मोक्तिक, लता गज्जर, रूता देसाई, मनीष जोशी, निखिल देशपांडे, विंदा महाजन, साळुंखे मॅडम यांनी चिऊची देखभाल केली.
''खरंतर असा श्वान कोणी घेत नाही; पण नाईक कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन तिला दत्तक घेतले. एक डोळा असलेल्या चिऊला तिचे हक्काचे घर मिळाले. यात खूप आनंद असून, तो चिऊच्या एका डोळ्यातूनही अनुभवायला मिळतोय. नवीन श्वान विकत घेण्यापेक्षा ज्या प्राण्यांना खरी गरज आहे, त्यांना दत्तक घ्यावे. आज ब्रिडिंगचे डॉग्स घेण्याच्या हट्टापायी एक महिन्यात पिलाला आईपासून वेगळे केले जाते. जबरदस्तीने ब्रिडिंग करवले जाते. हा प्रकार थांबवून गरज असलेल्या प्राण्यांवर माया दाखविली पाहिजे, असे ॲड. विंदा यांनी सांगितले.''