पुणे : पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्स या सिनेमागृहात 5 रुपयांच पॉपकॉर्न 200 रुपयांना का विकता अशी विचारणा करत आंदोलन करणाऱ्या आणि तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्या आरोपींना १ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एच. आर. जाधव यांच्या न्यायालयाने दिले.
मल्टिप्लेक्समध्ये विक्री करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दराबाबत उच्च न्यायालयाने नुकतीच नाराजी व्यक्त केली होती. न्यायलायने निर्णय दिल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पॉपकॉर्नचे दर तपासले. यावेळी मनसेचे कार्यकर्ते सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआर सिनेमागृहात गेले असताना तेथील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी संबंधिताला मारहाण केली होती. त्यामुळे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि 10 ते 15 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी यातील पाच जणांना अटक करून एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. आरोपींच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. रुपाली पाटील, अॅड. जयपाल पाटील आणि विष्णु होगे यांनी कामकाज पाहिले.