मोटार सायकल चालवताना मोबाईलवर बोलणे मैत्रिणींना पडले महागात; एक तरुणी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 07:32 PM2019-12-17T19:32:31+5:302019-12-17T19:55:31+5:30
कवडीपाट नाक्यावर मोटारसायकलला डिझेलची वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने दिली धडक
पुणे : मोटारसायकल चालवत असताना मोबाईलवर बोलणे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील दोन मैत्रिणींना चांगलेच महागात पडले आहे.पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट नाक्यावर मोटारसायकलला डिझेलची वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका मैत्रिणीला आपला जीव गमवावा लागला तर दुसरी मैत्रीण जखमी झाली आहे.
पूजा प्रकाश चव्हाण (वय ३२, रा. बालाजी टॉवर, कदमवाकवस्ती ता. हवेली, मुळगाव- हंचीनाळ,कर्नाटक) या अपघातात जागीच ठार झालेल्या मैत्रिणीचे नाव असून त्यांची मैत्रीण शितल सचिन शेंडगे (वय- 32, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती ता. हवेली) या जखमी किरकोळ झाल्या आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. 17) सकाळी दहा वाजनेच्या सुमारास झाला. दरम्यान, शितल शेंडगे यांच्यावर कदमवाकवस्ती येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालु असुन, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा चव्हाण व शितल शेंडगे या दोघींची मुले कदमवाकवस्ती येथील एंजल हायस्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत असल्याने, मागिल कांही वषार्पासुन दोघींची मैत्री होती. एंजल हायस्कुलमध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजनेच्या सुमारास पालक सभा असल्याने, पावणे दहा वाजण्याच्या सुमारास पुजा चव्हाण व शितल शेंडगे या दोघी मोटार सायकलवरुन शाळेत निघाल्या होत्या. शितल या मोटार सायकल चालवत होत्या तर पूजा या मागे बसल्या होत्या. मोटार सायकलवरुन दोघीजणी कवडीमाळवाडी बाजुकडुन येणाऱ्या रस्त्यावरून मुख्य पुणे-सोलापुर महामार्गावर आल्या असता, त्याचवेळी शेंडगे या फोनवर बोलण्याचा प्रयत्न करु लागल्या. दरम्यान कवडीपाट टोलनाक्यातुन बाहेर पडलेल्या डिझेलच्या टँकरने मोटारसायकलला शेंडगे यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात शेंडगे डाव्या बाजुला पडल्या तर चव्हाण उजव्या बाजुला पडल्या. त्याचवेळी टॅकरचे पुढील चालक पूजा चव्हाण यांच्या छातीवरुन गेले. यात पुजा गंभीर जखमी झाल्या.
टोलनाक्यावरील स्थानिक नागरिकांनी दोघीनाही पुढील उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरु करण्यापूर्वीच पूजा यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पूजा यांचे पती, प्रकाश महादेव चव्हाण हे वीज वितरण कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकारी आहेत. पूजा यांना दोन लहान मुले आहेत. विशेष बाब म्हणजे पूजा या मोटार सायकलवररुन प्रवास करण्यास घाबरत होत्या.