पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील टोल नाक्यावर कब्जा करीत, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये बदल करून प्रवाशांना बनावट टोल पावती देत फसवणूक केल्याप्रकरणी एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
विकास दिनकर शिंदे (रा. सोनगीरवाडी, ता.वाई, जि.सातारा) असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षाच्या वतीने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील अगरवाल यांनी विरोध केला. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. पुरवार यांनी ती मान्य केली.
विकास याचे खेड शिवापूर टोल नाका येथील मॅनेजमेंट स्टाफ मध्ये नाव असून, त्याने पीएसटीआरपीएल यांचा आनेवाडी येथील टोल नाक्यावर कब्जा करत, राजकीय दबाव आणून तेथे टोल वसुली चालू ठेवली. लेन नं. १ व १६ वरील सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनमध्ये फक्त बदलच केला नाही, तर तेथील सीस्टिमला नवीन प्रिंटर जोडून त्याआधारे खोट्या पावत्या तयार करून प्रवाशांना दिल्या. याद्वारे आरोपींनी १३० रुपयांची पावती देऊन ४६ हजार वाहने सोडल्याचे ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. याद्वारे त्यांनी कंपनीची ५९ लाख ८० हजारांची फसवणूक केली असल्याने शिंदे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.