कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी खासगी शाळांनी शुल्कात कोणतीही कपात केलेली नाही. याउलट ऑनलाइन शिक्षणासाठी संगणक, टॅब, अँड्रॉइड मोबाइल आणि इंटरनेट याचा आर्थिक भार पालकांवर पडला आहे. दोन किंवा अधिक मुले असणाऱ्या पालकांना प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र अँड्रॉइड मोबाईल घ्यावा लागत आहे. शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणामुळे शैक्षणिक दर्जा कमी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
-------------------------
माझ्या दोन्ही मुलांचे ऑनलाइन वर्ग एकाच वेळी असतात. त्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्यावा लागला. तासंतास मोबाईलसमोर बसून मुलांना कंटाळा येत आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये अडचण येऊ नये यासाठी दर महिन्याला ‘वायफाय’वर सहाशे रुपये खर्च करावे लागत आहेत. तसेच मुलांना मोबाईलचे व्यसन तर लागणार नाही ना, याचीही भीती वाटत आहे.
- सुवर्णा सूर्यवंशी, पालक
---------------------
लहान मुले ऑनलाइन शिक्षणाला कंटाळली आहेत. बऱ्याच वेळा शिक्षक काय सांगतात याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष नसते. काही विषय प्रत्यक्ष शिकवल्याशिवाय समजत नाहीत. एकाच जागी सातत्याने बसल्यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ नये, याची भीती वाटते. लहान मुले इलेक्ट्रॉनिक वस्तू चांगल्या पद्धतीने हाताळतीलच असे नाही. त्यामुळे पालकांना या वस्तूंच्या दुरुस्तीचा खर्चही करावा लागत आहे.
- बलविंदर सिंग, पालक
---------------
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शैक्षणिक जीवनाचा आनंद घेता येत नाही. मुलांना त्यांचे मित्र भेटत नाहीत. तसेच ऑनलाइन लेक्चरसाठी अधिकाधिक वेळ संगणक किंवा मोबाईल समोर घालावा लागत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोकेदुखी, डोळ्यांचे आजार, पाठीचे आजार वाढत आहेत. अभ्यासाची आवड नसणारे मुले स्क्रीन सुरू ठेवून गेम खेळत असल्याचे प्रकार काढत आहे. त्यामुळे गेमिंगचे व्यसन जडत आहे. शिक्षक-विद्यार्थी संवाद होत नसल्यामुळे शैक्षणिक दर्जा कमी झाला आहे.
- डॉ. हिमानी कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ
-----------
जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
पहिली - १,९०,०६१
दुसरी-१,९२,५९२
तिसरी-१,९०,१३१
चौथी-१,९०,५७५
पाचवी -१,८६,९९६
सहावी -१,८३,२१४
सातवी -१,७७,८७३
आठवी -१,७०,८२२
नववी -१,६७,८६२
दहावी -१,४४,३८४
----
ऑनलाइन शिक्षणामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक, लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड मोबाइल घ्यावा लागला आहे. त्यामुळे एका कुटुंबाला सुमारे २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागला. तसेच इंटरनेट साठी प्रत्येक महिन्याला सुमारे ६०० रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागत आहे.