डीएसकेंच्या खात्यात केवळ ४३ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 11:59 PM2018-03-06T23:59:21+5:302018-03-06T23:59:21+5:30
ठेवीदार आणि बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विविध २७५ बँक खात्यात केवळ ४३ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती पुढे आली आहे.
पुणे : ठेवीदार आणि बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विविध २७५ बँक खात्यात केवळ ४३ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती पुढे आली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके दाम्पत्यांना अटक केली होती. त्यानंतर सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
डी. एस. कुलकर्णी यांची पुणे, मुंबई येथील कार्यालये, घरे यांच्यावर छापे घालून आर्थिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे ताब्यात घेतली होती. तसेच त्याचवेळी त्यांची विविध बँकांमध्ये असलेली २७५ बँक खाती गोठवली होती. या बँक खात्यात मोठी रक्कम शिल्लक असेल, अशी पोलिसांची अपेक्षा होती. डीएसके यांच्याविरोधात आतापर्यंत ५ हजारांपेक्षा अधिक तक्रारदारांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दिल्या आहेत.
डीएसके यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे. त्यांनी डीएसके यांच्या बँक खात्याची तपासणी करून पोलिसांना फॉरेंसिक रिपोर्ट नुकताच सादर केला. त्यानुसार या सर्व बँक खात्यात मिळून केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये असल्याची माहिती समोर असली असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी दिली. पोलिसांनी डीएसके यांच्या ७ आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. याशिवाय त्यांच्या मालमत्तांची यादी करून त्याच्या लिलावाच्या प्रक्रियेसाठी महसूल विभागाकडे पाठविली आहे. महसूल विभागाने २४६ मालमत्तांचा प्रस्ताव तयार करून त्याची अधिसूचना काढण्यासाठी गृहखात्याकडे सादर केला आहे. ही अधिसूचना निघाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्ता लिलावाची प्रक्रिया सुरू होणार आहे.